29 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
Homeसंपादकीयपंडित नेहरूंच्या तुलनेत नरेंद्र मोदी सुमार दर्जाचे (भाग ४)

पंडित नेहरूंच्या तुलनेत नरेंद्र मोदी सुमार दर्जाचे (भाग ४)

साहित्य संस्कृती, विज्ञान, राजकारण असो कोणतेही क्षेत्र नाही व नव्हते जे गांधी-नेहरूंच्या प्रेरणेने पुढाकाराने विकसित झाले नाही. ललित कला अकादमी, साहित्य अकादमी असा संस्था स्थापणारे नेहरू हे भाभा अणू संशोधन संस्था, इस्रो, भौतिक, रसायन, धातुविज्ञान या विषयांवर राष्ट्रीय प्रयोगशाळाही त्यांनी स्थापन केल्या. गांधी-नेहरूंमुळे शून्यातून उभा राहिलेला आपला देश भक्कम झाला, सर्वच आघाडीवर प्रगत झाला, यात काही शंका नाही. मात्र अलीकडे सोशल मीडिया आणि संघपरिवारातील हिंदुत्ववादी यांनी गांधी-नेहरूंना बदनाम करण्याची विखारी मोहीम उघडली आहे... वरिष्ठ पत्रकार प्रमोद चुंचूवार यांचा विशेष लेख

देशासाठी संसदीय लोकशाहीचा पहिलाच अनुभव असल्याने आपल्यासोबतच देशातील सर्व प्रमुख नेत्यांना लोकशाहीचे प्रशिक्षण मिळावे, देशाचा विकास केवळ पंतप्रधान वा केंद्रीय मंत्रिमंडळ एकटा करू शकत नाही तर त्यासाठी राज्यातील नेतृत्वाचीही साथ आवश्यक आहे, हा संदेश आपल्या कृतीतून देत नेहरूंनी देशात ‘संघराज्य’ प्रणाली भक्कम केली. यासाठी त्यांनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना नियमित पत्रे लिहिली. ‘लेटर्स टू चीफ मिनिस्टर्स’ या त्यांनी मुख्यमंत्र्यांनी लिहिलेल्या पत्रांचा संग्रह वाचला की, आज ‘मन की बात’ ठोकणारे पंतप्रधान नेहरूंच्या तुलनेत किती सुमार दर्जाचे आहेत हे आपल्या सहज लक्षात येते.
“Achieved against daunting odds, democracy in India—adult suffrage, a sovereign Parliament, a free press, anindependent judiciary—is Nehru’s most lasting monument,’’ एस. गोपाल या विचारवंताने लोकशाहीची पायाभरणी करताना नेहरूंनी केलेल्या कामाचे मार्मिक शब्दात मूल्यमापन केले आहे. पाश्चिमात्य देशातही मतदानाचा अधिकार अनेक वर्षे अभिजन व श्रीमंत वर्गापर्यंतच मर्यादित असताना नेहरूंनी मात्र २१ वर्षे व त्याहून अधिक वयाच्या सर्वांनाच मताधिकार देण्याची आग्रही भूमिका घेऊन ती अमलात आणून दाखविली.
जग जेव्हा अमेरिका आणि रशिया यांच्यात विभागला गेला होता तेव्हा तिसऱ्या विश्वातील विकसनशील देशांना एकत्र करून अलिप्ततावादी चळवळ उभारण्याचे अतिशय महत्त्वाचे काम त्यांनी केले. या चळवळीचे वैचारिक नेतृत्व करून जगात सत्तासंतुलन घडवून आणणारे नेतृत्वही नेहरूंचेच. परराष्ट्रमंत्री नेहरूंच्या द्रष्ट्या परराष्ट्र धोरणामुळेच आज जगात भारताचा दबदबा आहे.

हे सुद्धा वाचा

महात्मा गांधी यांनी देशातील पहिली राज्यघटना लिहिली होती (वरिष्ठ पत्रकार प्रमोद चुंचूवार यांचा विशेष लेख)

महात्मा गांधी यांच्यामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना संविधान लिहिण्याची संधी मिळाली होती (भाग -२ )

महात्मा गांधी, पंडित नेहरू, डॉ. आंबेडकर, वल्लभभाई पटेल, सुभाषचंद्र बोस यांच्यात आपण भांडणे लावतो – भाग २ (राजदीप सरदेसाई यांचा विशेष लेख)

गांधी – नेहरू यांच्यामुळे देशाचे भलेच झाले – उत्तरार्ध (शरद पवार यांचा विशेष लेख)

प्रसिद्ध परराष्ट्र तज्ञ्ज मुचकूंद दुबे यांनी नेहरूंच्या परराष्ट्र धोरणातील कर्तृत्वाची थोरवी सांगणारा एक लेख ‘विटनेस टू हिस्ट्री’ या ऑक्सफर्ड प्रकाशनाने प्रकाशित पुस्तकात प्रसिद्ध झालाय. यातील एक हृद्य आठवणीचा मराठी अनुवाद, पुढीलप्रमाणे-
“संयुक्त राष्ट्राच्या इतिहासातील अतिशय महत्त्वाची व्यापार आणि विकासावरील परिषद (यू.एन.सी.टी.ए.डी.) जिनेव्हा येथे ऐन भरात असतानाच २७ मे १९६४ रोजी पंडित नेहरूंच्या निधनाचे वृत्त मला कळले. भारतीय शिष्टमंडळाचा सचिव या नात्याने मी हे वृत्त शिष्टमंडळाच्या प्रमुखांना कळविले. या परिषदेचे अध्यक्ष आणि सरचिटणीस यांना हे वृत्त कळले तेव्हा त्यांनी पंडित नेहरू यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी एक विशेष सत्र आयोजित केले. या सत्रात जगभरातल्या प्रतिनिधींनी नेहरूंची थोरवी सांगणारी, ते जागतिक दर्जाचे नेते कसे होते हे सांगणारी अतिशय अभ्यासपूर्ण भाषणे केली.
परिषदेसाठी स्थापन करण्यात आलेल्या पाचही समित्यांच्या अध्यक्षांनी आपापल्या समित्यांचे कामकाज थांबवून नेहरूंना श्रद्धांजली वाहिली. या सर्व श्रद्धांजली सभांना उपस्थित राहिल्यानंतर मी ज्या परराष्ट्रमंत्र्यांच्या हाताखाली काम केले ते केवळ भारतातील सर्वश्रेष्ठ नेतेच नव्हते तर आधुनिक काळातील एक सर्वश्रेष्ठ नेते होते याची मला खात्री पटली!’’
मूठभर श्रीमंत देश आणि बहुसंख्येने गरीब देश असे चित्र मानवतेसाठी, जागतिक शांततेसाठी कदापिही योग्य नाही, ही भूमिका नेहरूंनी जागतिक पातळीवर सर्वप्रथम ठामपणे मांडली. एखाद्या ठिकाणी असलेले दारिद्र्य हे जगभरातील समृद्धीला धोकादायक ठरते, असे नेहरूंचे मत होते.
“Nor, indeed there can be balanced economy in the world as a whole if the undeveloped parts continue to upset that balance and drag down even the more prosperous nations. Both for economic and political reasons, therefore, it has become essential to develop these undeveloped regions and to raise the standards of the people there,” अशा शब्दांत नेहरूंनी २० ऑक्टोबर १९४९ रोजी कॅनडाच्या संसदेत ही विश्वकल्याणाची भूमिका मांडली. महात्मा गांधी आणि नेहरू या दोघांनीही समान आणि स्वतंत्र देशांच्या एक वैश्विक महासंघाच्या संकल्पनेवर नेहमीच भर दिला.
महात्मा गांधींच्या विचारातून प्रेरणा घेऊन देशभर हजारो लोक विविध सामाजिक संघटना, सामाजिक कार्ये यांना आयुष्य वाहून घेऊन काम करीत आहेत. बाबा आमटेंचे कुष्ठरोग निर्मूलनाचे कार्य असो की आनंदवनाची स्थापना, राळेगण सिद्धीचा कायापालट घडविणारे अण्णा हजारे, पाणी प्रश्नावर काम करणारे राजेंद्र सिंह असोत या साऱ्यांची प्रेरणा गांधी आहेत. भारतात समाजसेवेच्या क्षेत्रात काम करून मॅगेसेसे पुरस्कार मिळालेल्या विविध क्षेत्रांतील थोर समाजसेवकांच्या यादींवर एक नजर टाकली तरी हे लक्षात येते की, त्यांच्यापैकी जवळपास सर्वांवरच महात्मा गांधींच्याच विचारांचा पगडा आहे.
आर्थिक क्षेत्रात, महिलांच्या कल्याणाच्या, लघुद्योग क्षेत्रात काम करणाऱ्यांबद्दलही असेच म्हणता येईल. गांधींच्या विचारांनी प्रभावित झालेले जमनालाल बजाज आणि घनश्यामदास बिर्ला या देशाच्या औद्योगिक प्रगतीची मुहूर्तमेढ रोवणा-या उद्योजकांची नावही आपल्याला माहिती आहेत.
साहित्य संस्कृती, विज्ञान, राजकारण असो कोणतेही क्षेत्र नाही व नव्हते जे गांधी-नेहरूंच्या प्रेरणेने पुढाकाराने विकसित झाले नाही. ललित कला अकादमी, साहित्य अकादमी असा संस्था स्थापणारे नेहरू हे भाभा अणू संशोधन संस्था, इस्रो, भौतिक, रसायन, धातुविज्ञान या विषयांवर राष्ट्रीय प्रयोगशाळाही त्यांनी स्थापन केल्या.
गांधी-नेहरूंमुळे शून्यातून उभा राहिलेला आपला देश भक्कम झाला, सर्वच आघाडीवर प्रगत झाला, यात काही शंका नाही. मात्र अलीकडे सोशल मीडिया आणि संघपरिवारातील हिंदुत्ववादी यांनी गांधी-नेहरूंना बदनाम करण्याची विखारी मोहीम उघडली आहे. स्वातंत्र्य चळवळीकडे पाठ फिरवून इंग्रजांची गुलामी करणारे, इंग्रजांकडून स्वातंत्र्य चळवळीत सहभागी न होण्याच्या बदल्यात निवृत्तिवेतन घेणाऱ्यांच्या अनुयायांकडून यापेक्षा अपेक्षा तरी काय ठेवणार? देशातील सुबुद्ध जनता त्यांना याबद्दल अधूनमधून धडा शिकवित असते. त्यामुळेच मनात गांधींबद्दल द्वेष असतानाही विदेशी पाहुण्यांना राजघाटावर घेऊन जाण्याशिवाय आणि वेळोवेळी गांधींना वंदन करण्याशिवाय त्यांना पर्याय उरत नाही!

‘गांधी – नेहरू यांनी देशाचं खरंच नुकसान केलं का ?’ या नावाने ‘लय भारी’ने नुकताच एक विशेषांक प्रसिद्ध केला आहे. या अंकात राजकीय, सामाजिक, प्रशासकीय, पत्रकारीता इत्यादी क्षेत्रातील ४५ पेक्षा जास्त नामवंत मान्यवरांनी लेख लिहिले आहेत. यांत शरद पवार, राजदीप सरदेसाई, भाऊ तोरसेकर, श्रीराम पवार, यशवंतराव गडाख, तुषार गांधी, राजू परूळेकर, प्रा. एन. जी. राजूरकर, कुमार सप्तर्षी, अशोक चौसाळकर, संजय आवटे, श्रीमंत माने, राजेंद्र साठे, अतुल भातखळकर, माधव भांडारी, आशिष शेलार, विजय वडेट्टीवार, सत्यजित तांबे, चंद्रकांत दळवी, प्रभाकर देशमुख, प्रसाद काथे, बंधुराज लोणे, प्रमोद चुंचूवार, रफिक मुल्ला, प्रफुल्ल फडके, राजन वेळूकर, नाना पटोले, उल्हास पवार, , विश्वास काश्यप, राज कुलकर्णी, राजेश खरात आदींचा समावेश आहे. या अंकातील निवडक लेख आम्ही प्रसिद्ध करीत आहोत. हा विशेषांक खरेदी करण्यासाठी संपादक श्री. तुषार खरात यांच्याशी ९८२१२८८६२२ या क्रमांकावर संपर्क साधावा.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी