33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडमध्ये उभारणार सुपारी संशोधन केंद्र, आदिती तटकरे यांच्या पाठपुराव्यांना यश

रायगडमध्ये उभारणार सुपारी संशोधन केंद्र, आदिती तटकरे यांच्या पाठपुराव्यांना यश

राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या निर्णयानुसार रायगड जिल्ह्याच्या श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगार येथे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत सुपारी संशोधन केंद्र उभारण्यास कृषी विभागाने मान्यता प्रदान केली आहे. या महत्वपूर्ण प्रकल्पासाठी 5 कोटी 64 लाख रुपये निधी खर्चास मान्यता देण्यात आली आहे. महिला व बालविकास मंत्री आदीती तटकरे यांनी याबाबत सातत्याने पाठपुरावा केला असल्यामुळे त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली व आदीती तटकरे यांच्या उपस्थितीत मंगळवारी, (27 सप्टेंबर) यासंदर्भात बैठक पार पडली होती, या बैठकीत सुपारी संशोधन केंद्र दिवेआगार येथील 5 एकर जागेत उभारण्याबाबत निर्णय कृषी विभागाने घेतला.

रायगड जिल्ह्यात सुपारीचे बागायती पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची साथ मिळावी यादृष्टीने सुपारी संशोधन केंद्र उभारले जावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे, महिला व बालविकास मंत्री आदीती तटकरे तसेच आमदार अनिकेत तटकरे हे आग्रही होते.

या सुपारी संशोधन केंद्राच्या माध्यमातून सुपारीच्या बुटक्या तसेच अधिक दर्जेदार व अधिकचे उत्पन्न देणाऱ्या जाती विकसित करणे, दिवे आगार व परिसरातील हवामानाचा विचार करून आंतरपिके घेण्याचे तंत्रज्ञान विकसित करणे, विकसित तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन, रोजगार निर्मिती, रोपवाटिका उभारणे, कलमे विकसित करणे, परिसरातील गावांचा ग्रामविकास आराखडा तयार करणे असे अनेक उपक्रम राबविण्यात येतील.


याबाबत आदिती तटकरे यांनी ‘X’ वरुन (पूर्वीचे ट्विटर) माहिती देताना सांगितले की, “डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली अंतर्गत दिवेआगार, ता. श्रीवर्धन, जि. रायगड येथे 2 हेक्टर जमिनीवर सुपारी संशोधन (विस्तारित) केंद्र निर्माण करण्यास शासन मान्यता देण्यात आली असून यासाठी 5.64 कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. या निर्णयाबद्दल महाराष्ट्र शासनाचे मनपूर्वक आभार.”

हे ही वाचा 

भाजप लोकांची माफी मागणार का? रोहित पवार यांचा सवाल

शिवरायांचा पुतळा आता काश्मीरमध्ये, मुख्यमंत्र्यांनी केले अनावरण

धनगर आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या युवकाच्या कुटुंबाला सरकारकडून आर्थिक मदत

“रायगड जिल्हयामधील श्रीवर्धन आणि नजीकच्या तालुक्यांमधील सुपारी हे अत्यंत महत्वाचे व व्यापारी तत्वावर घेण्यात येणारे नगदी बागायती पीक आहे. या परिसरामध्ये होणारी सुपारीही वैशिष्टपूर्ण असून भौगोलिक मानांकनास पात्र आहे. यासाठी सुपारी संशोधन केंद्राचा विस्तार करण्याची आग्रही मागणी करण्यात आली होती. या प्रयत्नांना यश आले याचे समाधान व्यक्त करते. या विस्तारित केंद्रामुळे सुपारी पिकांवरील संशोधनास चालना मिळेल. तसेच रोजगार निर्मिती होऊन शेती उत्पन्नातही वाढ होईल व परिसराच्या विकासाला गती मिळेल,” त्या पुढे म्हणाल्या.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी