30 C
Mumbai
Friday, May 10, 2024
Homeमहाराष्ट्रपतीचा काटा काढण्यासाठी जीवे मारण्याचा प्रयत्न

पतीचा काटा काढण्यासाठी जीवे मारण्याचा प्रयत्न

खर्चासाठी पैसे देत नाही आणि फिरायचे स्वातंत्र्य देत नसल्याने पत्नीने आपल्या दोन साथीदारांसह मिळून थेट पतीचा काटा काढण्यासाठी जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे पतीला मारण्यासाठी पत्नीने पहिले बियर पाजली आणि नंतर आपल्या साथीदारांना घरात घेत विषारी सर्प दंश करून गळा आवळत जीव घेण्याचा प्रयत्न केला असल्याचे उघड झाले आहे. दैव बलवत्तर म्हणून या जीवघेण्या हल्ल्यातील पती वाचला आहे. याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात पत्नी आणि अज्ञात दोघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आपला पती सत्यवानाचा जीव वाचविण्यासाठी पत्नी सावित्री हि यमराजाला हरवून आपल्या पतीचा जीव वाचविला म्हणून आपल्याकडे पतीला दीर्घायुष्य आणि सात जन्मी हाच पती मिळावा म्हणून महिला वर्गाकडून मोठ्या उत्साहात वट सावित्री पौर्णिमा साजरी करतात.

मात्र, याच सुसंस्कृत महाराष्ट्रात पती पैसे खर्च करू देत नाही आणि फिरण्यास स्वातंत्र्य देत नसल्याच्या किरकोळ कारणावरून थेट आपल्या साथीदारांना घरी बोलावून पतीला सापाचा चावा देऊन मारण्याचा प्रयत्न केला गेल्याची दुर्दैवी आणि संतापजनक घटना म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघड झाली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून पती पत्नीच्या नात्याला काळीमा फासला गेला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती आणि फिर्यादी विशाल पोपटराव पाटील, ४१ रा. साईप्रसाद बंगला, उज्ज्वल नगर, एअरफोर्स स्टेशन गेटजवळ, बोरगड, नाशिक यांनी दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार त्यांची पत्नी संशयित सोनी उर्फ एकता राजेंद्र जगताप हिला पहिल्यापासून अतिखर्चिक आणि चांगले राहण्याची सवय होती. मात्र, आपली आर्थिक परस्थिती साधारण असल्याने तिला खर्च कमी ठेवण्याचा आग्रह करीत असल्याने पत्नी पत्नीमध्ये कायम वाद होत होते. त्यानंतर वाद झाल्यानंतर एकदा एकता आपल्या लातूर येथील मैत्रिणीकडे निघून गेली होती. मात्र, तिची समजूत काढून तिला पुन्हा नाशिकला विशालने आणल्यानंतर पाच सहा महिने दोघे चांगला संसार करत असल्याचे विशाल याने फिर्यादीत सांगितले आहे.

हे ही वाचा

बनावट कागदपत्रांद्वारे मुख्यमंत्री सहायता निधी हडपला

छगन भुजबळ यांनी दिला राजीनामा? अजित पवार गटाच्या नेत्यानं दिला दुजोरा

शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर याचं आकस्मित निधन

मात्र, अचानक शनिवार दि. २७ रोजी संध्याकाळी पत्नी एकता हिने विशालला बियर घेऊन येण्यास सांगितले. यावर विशालने आपल्याकडे पैसे नसल्याचे सांगताच एकताने त्याला बियर साठी पैसे दिले. त्यानंतर बियर पिण्यास देऊन एकता आपल्या मुलीला घेऊन बेडरूम मध्ये झोपायला गेली. मुलीला झोपवून एकता पुन्हा विशालसोबत येऊन बसली त्यानंतर रात्री सुमारे पावणे अकरा वाजेच्या सुमारास विशालने तिला जेवण देण्यास सांगितले त्यावेळी एकता हिने घराचा मागील दरवाजा उघडा ठेवून स्वयंपाक घरात गेली.

दरम्यान याचवेळी उघड्या दरवाज्यातून एक अज्ञात अनोळखी संशयिताने घरात प्रवेश केला. या संशयिताने डोक्यात हेल्मेट, डोळ्यावर गॉगल, हातात हातमोजे आणि पाठीवर सॅक घेऊन आला होता. घरात येताच त्याने विशालचा गळा आवळण्यास सुरुवात केली. यामध्ये दोघांची सुरु असलेली झटापट एकता बघत होती. यावेळी विशालने एकताला विचारले काय प्लॅन आहे. त्यावेळी तिने आपल्या घरात दोन संशयित घुसले असून त्यांनी आपल्यावर हल्ला केला असल्याचे सांगितले. त्यामुळे विशालला आपल्यासोबत काहीतरी दुर्घटना घडत असल्याचे समजले. आणि त्याने प्रतिकार करण्यास सुरुवात केली.

यावेळी एकता हिने विशालच्या तोंडावर उशी ठेवून नाक तोंड दाबण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रतिकार सुरु असल्याने घरात शिरलेल्या संशयिताने आपल्यासोबत आणलेल्या सॅक मधून एक विषारी साप काढत विशालच्या मानेजवळ घेऊन गेला असता सापाने विशालच्या गळ्यावर चावा घेतला. त्यावेळी त्याने सांगितले कि आटा तू दोन तासात मरशील आणि साप सॅक मध्ये ठेवला. यावेळी विशालने या दोघांच्या ताब्यातून कशीबशी आपली सुटका करून घरातून पळ काढला आणि आपल्या मित्रांकडे मदत मागितली. यावर मित्रांनी तात्काळ विशाल याला जिल्हा रुग्नालयात उपचारासाठी दाखल केले. वेळीच उपचार भेटल्याने विशालचा जीव वाचला आहे. विशाल बोलण्याच्या परिस्थितीमध्ये येताच म्हसरूळ पोलिसांनी विशालचा जबाब घेत पत्नी एकता आणि दोघा अज्ञात संशयितांविरोधात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान विशाल घरातून जीव वाचवून पळून गेल्यानंतर पत्नी एकता हिने म्हसरूळ पोलीस ठाणे गाठून आपल्यावर हल्ला झाला असल्याचा बनाव करत गुन्हा दाखल करून घेण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकण्यास सुरुवात केली होती. मात्र, पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून गुन्हा दाखल करण्यात येईल असे सांगत गुन्हा दाखल न करता तपास सुरु केला होता. आणि याच दरम्यान जिल्हा रुग्नालयातून विशालवर हल्ला करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि सर्व प्रकार उघड झाला. दरम्यान या गुन्ह्यातील सर्व संशयित फरार झाले असून त्यांना शोधण्यासाठी म्हसरूळ पोलिसांची दोन पथके रवाना झाली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी