29 C
Mumbai
Tuesday, May 7, 2024
Homeमहाराष्ट्रखळबळजनक :  साताऱ्यातील ‘त्या’ मृतदेहामुळे एकाच कुटुंबातील नऊ जणांना ‘कोरोना’ची लागण, प्रशासनाच्या...

खळबळजनक :  साताऱ्यातील ‘त्या’ मृतदेहामुळे एकाच कुटुंबातील नऊ जणांना ‘कोरोना’ची लागण, प्रशासनाच्या बेफिकीरीचा परिणाम

टीम लय भारी

मुंबई : खासगी रूग्णालयाने केलेली पहिली घोडचूक, आणि त्यानंतर सरकारी यंत्रणेने केलेली दुसरी घोडचूक… अशा दोन्ही घोडचुकांचा मोठा फटका एका निष्पाप गावाला बसला आहे. ‘कोरोना’ पॉझिटिव्ह असलेल्या ‘त्या’ मृतदेहामुळे तब्बल नऊ जणांना ‘कोरोना’ची लागण झाल्याचे आढळून आले आहे ( Corona virus patient found due administration’s negligence in Satara ).

पांढरवाडी (ता. माण ) गावामध्ये हा प्रकार घडला आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरूद्ध आठल्ये यांनीही त्या कुटुंबातील आणखी नऊजणांना ( मृत महिलेसह १० जण ) ‘कोरोना’ची लागण झाल्याचे मान्य केले आहे. संशयास्पद व्यक्तींची आणखी तपासणी करण्यात येत आहे.

पांढरवाडीमधील एका महिलेला काही दिवसांपूर्वी ‘सातारा रूग्णालयात’ दाखल करण्यात आले होते. परंतु ही महिला गुरूवारी मृत झाली. शुक्रवारी तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शनिवारी संध्याकाळी मात्र संबंधित मृत महिला ‘कोरोना’बाधित असल्याचा अहवाल आला.

Corona virus
‘कोरोना’मुळे गाव बंद केले आहे

अहवाल येण्याअगोदरच संबंधित महिलेला ‘कोरोना’ची लागण नसल्याचे समजून गावकऱ्यांनी दिडशे जणांच्या उपस्थितीत अंत्यविधी केला होता. या अंत्यविधीमुळे मृतदेहाचा अनेकांशी संपर्क आला होता.

संपर्कात आलेल्या नऊ जणांना ‘कोरोना’ची लागण झाली आहे. संबंधित मृत महिलेच्या कुटुंबातीलच हे सगळेजण आहेत. यांत दोन पुरूष, दोन महिला, तीन मुली, एक मुलगा व एक २० वर्षीय तरूण यांचा समावेश आहे.

वाचा : सातारा प्रशासनाने कसा केला बेफिकीरपणा 

धक्कादायक म्हणजे, हे मृतदेह हाताळलेले अनेक नातलग अंत्यसंस्कार झाल्यानंतर अन्य गावांत गेले आहेत. अशा सगळ्यांचा शोध घेण्यास सुरूवात केली आहे. पांढरवाडी गावातील ज्या जाधववाडी वस्तीवर हा प्रकार झाला तेथील १४३ जणांची प्राथमिक तपासणी केली. त्यापैकी २८ जणांची ॲण्टीजन टेस्ट केली. त्यापैकी ९ जणांना ‘कोरोना’ची लागण झाल्याचे निदान झाले आहे.

‘लय भारी’मुळेच प्रकार आला उजेडात

संबंधित मृतदेह ‘कोरोना’ पॉझिटिव्ह असल्याचे शनिवारी स्पष्ट झाले. पण त्या मृतदेहावर दोन दिवस अगोदरच अंत्यसंस्कार झाले होते. त्यामुळे या पॉझिटिव्ह महिलेचा अहवाल लपविण्याचा प्रयत्न सरकारी यंत्रणेने केला होता.

मृत महिलेविषयीची ‘कोरोना’ची माहिती दाबून ठेवल्यानंतर माण तालुक्याच्या प्रांताधिकारी व तहसिलदार यांनी चिडीचूप राहण्याची भूमिका घेतली होती.

खासगी रूग्णालय, आरोग्य यंत्रणा आणि महसूल यंत्रणा अशा तिन्ही यंत्रणांनी आळी मिळी गुप चिळी साधली होती. पण ‘लय भारी’ने हा प्रकार चव्हाट्यावर आणला. आरोग्य मंत्री राजेश टोपे व त्यांच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या कानावर ‘लय भारी’च्या वतीने शनिवारी रात्री हा प्रकार घालण्यात आला. राजेश टोपे व त्यांचे सहकारी अधिकारी शनिवारी रात्रभर या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी फोनफोनी करीत होते. पण अधिकारी मात्र झोपले होते.

आज, रविवारी सातारामधील दिवस उजाडला तो ‘लय भारी’च्या स्फोटक बातमीनेच. तोपर्यंत राजेश टोपे यांनीही प्रशासनाचे कान पिळले होते. चिडीचूप बसलेली सरकारी यंत्रणा झाडून जागी झाली होती. आरोग्य यंत्रणेची एक दोन टीम गावात दाखल झाल्या. त्यांनी ॲण्टीजन टेस्ट केल्या. त्यात नऊ जण पॉझिटिव्ह आढळून आले.

रूग्णालयावर कारवाई करणार : जिल्हाधिकारी

या प्रकरणातील महिलेची कोरोना चाचणी केलेली होती. या चाचणीचा अहवाल येण्याअगोदरच ‘सातारा रूग्णालयाने’ या महिलेचा मृतदेह नातलगांच्या ताब्यात दिला होता. चाचणी घेतल्यानंतर अहवाल येईपर्यंतचा ‘प्रोटोकॉल’ रूग्णालयाने पाळलेला नाही. त्यामुळे या प्रकाराची चौकशी करून रूग्णालयावर योग्य ती कारवाई करू असे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी ‘लय भारी’शी बोलताना सांगितले.

रूग्णालयाने अंधारात ठेवून आम्हाला मृतदेह दिला : नातलगांचा आरोप

या महिलेचा गुरूवारी मृत्यू झाला होता. मृतदेह बॅगेत ठेवलेला नव्हता. तो बॅगेशिवायच रात्रभर ठेवला होता. आम्ही सकाळी हॉस्पीटलला गेलो. आम्ही कोणताही आग्रह हॉस्पीटलकडे केलेला नव्हता. हॉस्पीटलनेच मृतदेह घेऊन जाण्यास आम्हाला सांगितले. त्यामुळे आम्ही हा मृतदेह घेऊन घरी गेलो. ‘कोरोना’बाबत रूग्णालयाने आम्हाला कसलेही अवगत केले नाही. रूग्णालयाच्या या बेफिकीरपणामुळे आता आमच्या घरातील नऊजण निष्कारण कोरोनाबाधित झाले असल्याची नाराजी या कुटुंबातील नातलगांनी ‘लय भारी’शी बोलताना व्यक्त केली.

दोषींवर कारवाई करण्याची मागणी

या प्रकरणात रूग्णालय, आरोग्य यंत्रणा, प्रांताधिकारी आश्विनी जिरंगे, तहसिलदार बाई माने यांनी बेफिकीरपणा दाखविल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रकरण दडपण्याच्या नादात नऊजण कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यामुळे सरकारने आणखी प्रकरण दडपू नये. दोषींवर ठोस कारवाई करावी, अशी मागणीही गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी