38 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeमहाराष्ट्रपोलिसांची बदनामी थांबेल का ?

पोलिसांची बदनामी थांबेल का ?

ॲड. विश्वास काश्यप

पोलीस ही संस्था नेहमीच हेटाळणीची, बदनामीची, विनोदाची आणि फारच कमी कौतुकाची अशी राहिलेली आहे ( Police is always defame by public ).

पोलीस या संस्थेची जेवढी बदनामी चित्रपट व्यवसायाने केली आहे, तेवढी बदनामी आतापर्यंत कोणीच केली नाही. पिक्चरमध्ये जो चांगला पोलीस दाखविला जातो तितका चांगला पोलीस प्रत्यक्षात कधीच नसतो, अन् जितका वाईट पोलीस दाखविला जातो प्रत्यक्षात तो इतका वाईट कधीच नसतो. वास्तवातील पोलीस हा चित्रपटातील चांगला आणि वाईट यामध्ये कुठेतरी असतो आणि तोच खरा हिरो असतो ( Bollywood has made wrong picture of Police ).

चित्रपटात पोलीस जर हिरो असेल तर तो चांगला दाखविला जातो आणि पोलीस व्हिलन असेल तर तो वाईट दाखविला जातो. पूर्वीच्या चित्रपटात हिरो आणि खलनायकाच्या गँगमध्ये फायटिंग चालू असताना शेवटी पोलीस सायरन वाजवीत येतात आणि गॅंगला घेऊन जातात असा सीन हमखास असायचा. या सीनमध्ये पोलीस आल्या आल्या प्रेक्षकांमध्ये ते कुत्सित हास्य चित्रपटगृहात उमटायचे.

सध्याच्या चित्रपटात असे सीन्स कमी पाहायला मिळतात. थोडक्यात पोलिसांची प्रतिमा फार मोठ्या प्रमाणात बिघडविण्याचे काम चित्रपटांनी केले आहे. चित्रपटांचा प्रभाव समाजाच्या मोठ्या भागावर पडत असतो. त्यामुळे पोलिसांच्या भूमिका असणाऱ्या चित्रपटांसाठी सेन्सॉरने कडक भूमिका घेणे अतिशय आवश्यक बनते. अशा प्रकारच्या चित्रपटांच्या सेन्सॉर बोर्डात पोलिसांचे प्रतिनिधी म्हणून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याची नेमणूक करावी. या वरिष्ठ अधिकाऱ्याने चित्रपट सेन्सॉर करताना चित्रपटातील कोणत्याही एका शॉर्टमध्ये पोलिसांची बदनामी तर होत नाही ना याची खात्री करून किंवा तसे काही ठिकाणी कट सुचवून त्या चित्रपटाला मान्यता द्यावी.

पोलिसांनी त्यांची प्रतिमा कितीही चांगल्या प्रकारे जपली तरी चित्रपटातील एखादा शॉट हा त्या प्रतिमेची वाट लावीत असतो. पोलीस नावाची संस्था समाजामध्ये उच्च प्रतीची टिकवायची असेल तर अभिव्यक्ती स्वातंत्र्याला थोडेसे बाजूला ठेवावे लागेल.

पोलिसांचा भ्रष्टाचार हा अतिशय सौम्य स्वरूपाचा असतो. याठिकाणी भ्रष्टाचाराचे समर्थन करणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे हा उद्देश अजिबात नाही याची कृपया नोंद घ्यावी. परंतु इतर खात्यातील भ्रष्टाचारापेक्षा पोलीस खात्यातील भ्रष्टाचार फारच कमी प्रमाणात असतो. कस्टम , एक्साईज, महसूल, पीडब्ल्यूडी, औषधनिर्मिती, शिक्षण, वैद्यकीय व्यवसाय आणि असे इतर अनेक खाती आहेत की, जी भ्रष्टाचाराचे महामेरू आहेत.

रस्त्यावर ट्रॅफिक पोलिसाला आम्ही पन्नास रुपये देतो आणि त्याला बदनाम करतो. परंतु इतर खात्यात आम्ही काम करून घेताना लाखो रुपयांची लाच देतो ते ही कोणाला न सांगता. मुलांच्या ॲडमिशनसाठी शाळेत लाखो रुपयांची लाच दिली हे आम्ही अभिमानाने सांगतो. वैद्यकीय व्यवसायात प्रचंड भ्रष्टाचार चालतो याची आम्हाला काहीच माहिती नसते. इतके आम्ही बालिश ज्ञानी असतो.

पीडब्ल्यूडी खात्यात रस्ते न बांधताच लाखो रुपयांची बिले पास केली जातात हे आम्हा सर्वसामान्य जनतेला माहितच नसते इतका आमचा आयक्यू लहान असतो. याची आम्हाला लाज सुद्धा वाटत नाही. परंतु पोलिसांच्या भ्रष्टाचारावर बोलताना आमच्या गळ्याची नस तुटेपर्यंत आमचा आयक्यू आम्ही पाजळत असतो. का रे बाबा , सिग्नल पडल्यावर तू जेव्हा  गाडी थांबवून गाडीवर बसलेला असतो त्यावेळी ट्राफिक पोलीस येऊन तुझ्या खिशातील पैसे काढून घेतो का ?  परंतु तू जेव्हा सिग्नल तोडतो त्याच वेळेस पोलीस तुला पकडतात आणि कायदेशीर चार्ज भरायला सांगतात. त्यावेळी तूच त्यांना लाच घेण्यास प्रवृत्त करतो आणि त्यांनी लाच घेतल्यावर त्यांना बदनाम सुद्धा तूच करतोस. वा रे वा समाज. याठिकाणी लाच घेण्याचे समर्थन नाही याची कृपया नोंद घ्यावी. परंतु समाजाची डबल ढोलकी कशी असते हे दाखविण्याचा प्रयत्न आहे.

पोलीस आहेत म्हणून आमच्या आया बहिणी रस्त्यावर सुरक्षित फिरत आहेत. रस्त्यावर थांबलेला एक निशस्त्र पोलीस त्याच्या आजूबाजूच्या हजारो लोकांचे अप्रत्यक्षरीत्या संरक्षण करीत असतो. याचा कधी आम्ही विचारच करीत नाही. त्यांच्या रस्त्यावरील अस्तित्वामुळे आमचा आत्मविश्वास वाढलेला असतो हे आम्ही कसे विसरतो ? त्यांचा आम्हाला आधार असतो हे आमच्या लक्षात कसे येत नाही ?

सिग्नलवर उभा असणारा आमचा ट्राफिक पोलीस ऊन – पाऊस – वारा या वातावरणात कार्बन डायऑक्साइडच्या वेढ्यात ट्रॅफिक सुरळीत करीत असतो. तो असतो म्हणूनच आम्ही व्यवस्थित गाडी चालवत असतो. एखाद्या ठिकाणी ट्रॅफिक जाम होते तर त्या पोलिसांमुळे होत नाही तर आमच्या समाजातीलच एका अति शहाण्याने गाडी आडवी तिडवी चालविल्यामुळे किंवा पार्क केल्यामुळे.

ट्रॅफिक पोलीस जेव्हा त्याचे नाक शिंकरतो तेव्हा त्याच्या नाकातून काळी कार्बन डाय ऑक्सईडची काजळी निघत असते हे किती जणांना ठाऊक आहे. आमचे आवाहन आहे सर्वसामान्य जनतेला की, दुपारच्या कडक उन्हात रस्त्यावर अर्धा तास, फक्त अर्धा तास उभे राहून दाखवावे. रात्रीच्या वेळी रस्त्यावर उभा असलेला एक युनिफॉर्ममधील पोलीस त्या परिसरातील एक हजार मीटरचा परिसर सुरक्षित ठेवीत असतो. पोलिसांची फिरणारी वाहने संपूर्ण परिसर निश्चिंत ठेवीत असतात. याची आम्हाला माहितीच नसते. कारण आम्ही समाज म्हणून अशा पद्धतीने विचारच करीत नाही.

व्यापारी, उद्योगधंदे पोलिसांच्या अस्तित्वाने सुरक्षित असतात हे या व्यापाऱ्यांना, उद्योगपतींना कळतच नाही. बाजारातील एखादा दुकानदार पोलिसांकडे वेगळ्या अँगलने पाहत असतो. परंतु या पोलिसांमुळे मी दुकानातील गल्ल्यावर निवांत बसलो आहे याची त्याला जाणीवच नसते.

पोलीस आमच्या जीवनातील अविभाज्य घटक आहे. प्रत्येकाच्याच कुतूहलाचा, माहित असलेला, परंतु शापित असलेला.

पोलिसांसारखे सामाजिक महत्वाचे काम कोणतेच खाते करीत नाही. इतके असूनही पोलिसांना सगळ्यात जास्त बदनाम करून ठेवले आहे. चोरी झाली की पोलीस, घरातील नवरा बायकोचे कौटुंबिक भांडण झाले की पोलीस, नळावरील भांडण झाले तरी पोलीस, कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस, कागदपत्रे हरवले की पोलीस, बँकेने पैसे बुडविले की पोलीस, घरातील कोणी हरविले की पोलीस, निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी पोलीस, ट्रॅफिक सुरळीत करण्यासाठी पोलीस. पदोपदी पोलिसांची गरज लागते ( Policeman is real social worker ).

आमच्या सगळ्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग पोलीस असताना पोलिसांच्या प्रती आम्ही इतके उदासीन का ? आम्हाला ते आपले का वाटत नाहीत ? आम्हाला त्यांच्याप्रती खरा आदरभाव का वाटत नाही ? ते आम्हाला प्रामाणिक का वाटत नाहीत ? या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा दोन्ही बाजूने प्रयत्न होणे अत्यावश्यक आहे .

पोलीस स्टेशनला आलेल्या दोन तक्रारदारांना पोलीस कसे काय खुश ठेऊ शकतील हो ? प्रत्येकाला वाटते आमचेच खरे. पोलीस त्यांच्या अनुभवानुसार खरे खोटे ठरवितात, तक्रार घेतात. ज्याची तक्रार घेतली जाते तो खुश. ज्याची घेतली जात नाही तो नाखूष. जो खुश तो पोलिसांना चांगले बोलतो. जो नाखूष तो पोलिसांना वाईट बोलतो. पोलिसांच्या प्रती आमच्या निष्ठा, त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोण आम्ही कधी बदलणार आहोत ?

पोलिसांची सरकारी घरे जर तुम्ही पाहिलीत तर मलबार हिल परिसरातील एका फ्लॅट मधील बाथरूम सुद्धा खूप मोठे असते हो. त्या एवढ्या छोट्याश्या घरात ते मुलाबाळांसह कसा संसार करत असतील याचा तुम्ही विचार सुद्धा करू शकत नाही. पोलीस लाईन कशी असते हे सगळ्यांनी एकदा जाऊन पहावेच. बडे पोलीस अधिकारी म्हणजे आयपीएस हे सरकारकडून भूखंडाच्या भूखंड मंजूर करून घेतात आणि त्यावर एक एक आलिशान पाच हजार स्क्वेअर फुटाचे फ्लॅट तयार करतात. आणि हीच वरिष्ठ मंडळी कनिष्ठ पोलिसांच्या घरांच्या प्रश्नावर पोटतिडकीने बोलतात तेव्हा गंमत वाटते आणि मनातून राग सुद्धा येतो.

कनिष्ठ पोलीस अधिकारी – कर्मचारी यांचे मानसिक शारीरिक हाल होण्यास सर्वात जास्त जबाबदार असतील तर हे वरिष्ठ पोलीस अधिकारी. या वरिष्ठांनी त्यांच्या कनिष्ठांना अक्षरशः गुलाम करून ठेवले आहे. पोलिसांना सर्वात जास्त त्रास ह्या वरिष्ठांचाच असतो. ब्रिटिशांच्या काळापासून सुरू असलेले आयपीएस कॅडर तात्काळ बंद करावे लागणार आहे. यासाठी मोठी जनजागृती करावी लागेल. स्वतंत्र भारतासाठी स्वतंत्र पोलीस नियमावली बनवली गेलीच पाहिजे. नाहीतर भविष्यकाळ अतिशय भयंकर आणि गंभीर आहे.

पोलीस शिपायाच्या दोन पिढ्या एका सरकारी खोलीत जातात. कारण वडील पोलीस. ते निवृत्त झाल्यावर मुलगा पोलीस. मुंबईतील घर निवृत्तीनंतर जाऊ नये म्हणून कित्येक पोलिसांची हुशार उच्चशिक्षित मुले पोलीस शिपायाची नोकरी करतात. आपले तरुण उमेदीचे मन मारून ते पोलीस शिपाई होतात. ज्यावेळी तो निवृत्त होतो त्यावेळी लगेचच तीन महिन्यात त्याला त्या खोलीतून उसकावून लावण्यात येते. त्याच्या डोळ्यासमोर पोलीस लाईनमध्ये चणे विकणारा भैय्या मात्र पंधरा वर्षात एसआरए स्कीममध्ये दोन फ्लॅटचा मालक होऊन मुंबईत करोडपती झालेला असतो. हा पोलिस मात्र आयुष्यभर मुंबईत नोकरी करून  निवृत्तीनंतर कुठल्यातरी वसई – विरार कर्जत येथील चाळीत राहायला जातो. भैय्या मात्र दोन फ्लॅटचा मालक होऊन अस्सल मुंबईकर होऊन जातो. हे वास्तव आम्ही कधी लक्षात घेणार आहोत की नाही ?

‘लंडन’चा सार्जंट म्हणजेच आपला पोलीस शिपाई. हा सार्जंट पोलीस खात्यात भरती झाल्या झाल्या त्याला घर घेण्यासाठी कर्ज मिळते. त्याच्या संपूर्ण कुटुंबाची विमा पॉलिसी काढली जाते. आमच्या इथे कर्ज देणाऱ्या वित्तीय संस्था पोलिसांना कर्ज मिळणार नाही अशी उघड उघड जाहिरात करतात. आणि आम्ही कोणीही त्यावर काहीही बोलत नाही.

कोरोना काळात जीवावर उदार होऊन आपले कर्तव्य दिवस – रात्र करणाऱ्या पोलिसांना कंगना आणि इतर राजकीय महिला नावे ठेवतात. कारण पोलिसांना युनियन नसते. मुकी बिचारी कोणीही हाका. त्यांना कोणीही सोम्यागोम्या उठून नावे ठेवत असतो.

मुंबई पोलिस जगात सर्वश्रेष्ठ असल्याचा निर्वाळा माननीय मुंबई उच्च न्यायालयानेच दिल्याने आता दुसऱ्या कोणाच्या शिफारशीची आवश्यकता वाटत नाही.

काही २/४ पोलिसांमुळे संपूर्ण पोलीस खाते बदनाम होते. परंतु पोलीस आहे म्हणून समाज आहे. पोलीस आहे म्हणून आम्ही रात्रीचे निवांत झोपू शकतो. आमच्या आया बहिणींची सुरक्षितता ही फक्त पोलिसांमुळे आहे हे मात्र कोणी विसरू नये. जो करी जीवाची होळी छातीवर झेलून गोळी असा तो पोलीस. अशा पोलिसांना त्रिवार कडक सॅल्युट.

( लेखक माजी पोलिस अधिकारी असून सध्या मुंबई उच्च न्यायालयात वकिली करतात )

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी