33 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
HomeमुंबईDiwali : महाराष्ट्रातील धार्मिक स्थळं, शाळा दिवाळीनंतर सुरु करणार, मुख्यमंत्र्यांचे संकेत

Diwali : महाराष्ट्रातील धार्मिक स्थळं, शाळा दिवाळीनंतर सुरु करणार, मुख्यमंत्र्यांचे संकेत

दिवाळीनंतर (Diwali) कोरोनाच्या दुस-या लाटेची शक्यता गृहीत धरून

आरोग्य सुविधांचे नियोजन करण्याचेही दिले मुख्यमंत्र्यांनी निर्देश

टीम लय भारी

मुंबई : मुंबईत कोरोनाची रुग्ण संख्या घटत असली तरी पाश्चिमात्य देशात आलेल्या दुस-या लाटेच्या पार्श्वभूमीवर पुढील काही महिने यंत्रणांसोबतच नागरिकांनी अधिक खबरदारी घ्यावी, असे आवाहन करताना मास्क न वापरण्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

कोरोना वाढीचा दर तसेच मृत्यू दर कमी होताना दिसत असले तरी गाफील न राहता युरोपप्रमाणे दुस-या लाटेचा मुकाबला करण्याची तयारी ठेवा. माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेमुळे करोनाचा संसर्ग रोखण्यात काही प्रमाणात यशस्वी झालो असून डिसेंबरमध्येही पुन्हा ही मोहीम परिणामकारकपणे राबविण्याचे नियोजन करा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी राज्यभरातील जिल्हाधिका-यांना दिले. तसेच प्रार्थना स्थळे उघडण्याबाबतचा निर्णय दिवाळीनंतर घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मनसे, भाजपा यांनी महाराष्ट्रातील मंदिरं कधी उघडणार? असा प्रश्न सातत्याने महाराष्ट्र सरकारला विचारला. त्यासाठी आंदोलनंही केली. आता धार्मिक स्थळं दिवाळीनंतर उघडतील, असे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले आहेत.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कोरोनाचा संसर्ग नियंत्रित ठेवण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याशी दूरचित्र संवादाच्या माध्यमातून चर्चा करताना हे आदेश दिले.

प्रार्थना स्थळे उघडण्याच्या बाबतीतही दिवाळीनंतर निर्णय घेण्यात येईल. मंदिरांमध्ये ज्येष्ठ नागरिक नियमितपणे जातात, हा विषाणू ज्येष्ठ आणि सहव्याधी रुग्णांना अधिक धोकादायक असल्याने याबात अधिक काळजी घेऊन निर्णय घ्यावा लागत असल्याचेही त्यांनी सांगितले. माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेत सापडलेल्या सहव्याधी नागरिकांच्या संपर्कात राहणे गरजेचे असून त्यांची सातत्याने चौकशी करा. त्यामुळे कोरोनाची दुसरी लाट आली तरी मोठी आपत्ती टाळू शकू असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, कोरोना रूग्णांवर उपचारासाठी उभारण्यात आलेल्या रूग्णालय, केंद्रातील सुविधा काढून टाकू नका. उलट आरोग्य सुविधांमधील त्रुटी दूर करा, वैद्यकीय यंत्रणेला प्रशिक्षित करा, विभागवार डॉक्टर्सचा आढावा घ्या, कर्मचारी कमी करू नका. थोडी विश्रांती द्या पण तात्पुरत्या सुविधा कायमस्वरूपी होतील याकडे लक्ष द्या, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

मास्क न वापरणा-यांविरुद्ध कडक कारवाईचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

 

मुंबईत कोरोनाची रुग्ण संख्या घटत असली तरी पाश्चिमात्य देशात आलेल्या दुस-या लाटेच्या पार्श्वभूमीवर पुढील काही महिने यंत्रणांसोबतच नागरिकांनी अधिक खबरदारी घ्यावी, असे आवाहन करताना मास्क न वापरण्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. मुंबईत कोरोना उपचारासाठीच्या ज्या जम्बो सुविधा निर्माण केल्या आहेत, त्यांची देखभाल दुरूस्ती करावी. जेणेकरून आगामी काळात गरज भासल्यास त्यांचा वापर करता येईल. माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून राबविण्याचे विचाराधीन असल्याचे मुख्यमंत्र्यांनी आज येथे सांगितले.

कोरोनामुळे दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर बैठक घेतली. यावेळी परिवहनमंत्री अनिल परब, राज्य टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी, महापालिका आयुक्त आय. एस. चहल, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, मुंबई महापालिकेचे अतिरीक्त आयुक्त, सहआयुक्त, उपायुक्त यावेळी उपस्थित होते. मुंबई महानगरात माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम यशस्वीपणे राबविल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी महापालिका आयुक्त आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन केले.

यावेळी मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, जनतेला दिवाळी सुखाची जावी यासाठी आपण सर्वांनी सतर्कता बाळगत जनजागृतीच्या माध्यमातून कोरोनाचा धोका संपला नसल्याची जाणीव करून द्यावी. प्रदूषण कमी झाले नाही तर कोरोनाचे संकट कायम राहील ही बाब नागरिकांना पटवून द्यावी, असे आवाहन त्यांनी महापालिकेच्या अधिका-यांना केले.

रुग्णसंख्या कमी होत असल्याने नागरिकांमध्ये मास्क न वापरण्याबाबत बेफिकीरी दाखविली जात आहे. तसे न करता मास्क वापरण्याबाबत मोहीम अधिक तीव्र करावी. कायद्याचा धाक दाखवितानाच जनजागृतीवर अधिक भर देऊन मास्क वापरण्याचे आवाहन करावे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

गेल्या काही महिन्यांमध्ये कोरोना उपचारासाठी जी जम्बो सेंटर्स सुरू करण्यात आली आहेत त्याची भविष्यात गरज भासू शकते ही बाब लक्षात घेऊन नियोजन करावे. या सेंटर्सची आवश्यक तेथे देखभाल दुरुस्ती करून घ्यावी. औषधांची उपलब्धता ठेवावी. या सेंटर्समधील कर्मचा-यांना सुटी देण्याचे नियोजन करण्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

राज्य शासन टप्प्याटप्प्याने अनलॉक करीत आहे त्यामुळे गर्दी नियंत्रण आवश्यक असून दिवाळी आणि त्यानंतरचे १५ दिवस अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगतानाच ज्यांचा लोकांशी कायमच संपर्क येतो असे विक्रेते, बस चालक, वाहक यांची सातत्याने चाचणी करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सांसर्गिक आजारांवरील उपचाराचे ५००० खाटांचे रुग्णालय करण्याचा निर्धार मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. या रुग्णालयाचे काम करताना जनहित लक्षात घेऊन करावे, अशी सूचनाही त्यांनी महापालिकेच्या अधिका-यांना केली.
पुढील वर्ष पूरमुक्त ठेवायचं नियोजन आताच करावं त्यासाठी नाले रुंदीकरण, खोलीकरण ही कामे हाती घ्यावीत त्याचबरोबर रस्ते तसेच अन्य विकासकामांवर लक्ष केंद्रित करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेचा मुंबईत कशा प्रकारे परिणाम झाला याबाबत टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स (टीआयएसएस) संस्था अभ्यास करणार असल्याचे महापालिका आयुक्त श्री. चहल यांनी सांगितले. कोरोनाच्या मोफत चाचण्यांसाठी मुंबईत सध्या २४४ केंद्र सुरू करण्यात आले असून दररोज २० हजार चाचण्यांचे उद्दिष्ट असल्याचे श्री. चहल यांनी सांगितले. त्याचबरोबर मास्क न वापरणा-यांवर कारवाईसाठी अतिरिक्त मनुष्यबळ वाढविण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

दिवाळीनंतर शाळा सुरू करा – मुख्यमंत्री

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठीची योग्य ती खबरदारी घेऊन दिवाळीनंतर राज्यातील नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यात याव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित बैठकीत मुख्यमंत्री श्री. ठाकरे बोलत होते. या वेळी शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड, राज्यमंत्री बच्चू कडू, अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, जागतिक परिस्थिती पाहता कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दिवाळीनंतर पुढचे काही दिवस अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. ज्या शाळांमध्ये क्वारंटाईन सेंटर्स तयार करण्यात आले होते, ते सेंटर्स बंद करता येणार नाहीत. अशा ठिकाणच्या शाळा पर्यायी जागेत सुरू करता येतील का, याबाबत स्थानिक प्रशासनाने निर्णय घ्यावा. शाळांचे सॅनिटायजेशन, शिक्षकांची कोरोना तपासणी यासारख्या सर्व बाबींची काळजी घेणे आवश्यक आहे. ज्या घरातील व्यक्ती किंवा मुले आजारी आहेत अशा पाल्यांना पालकांनी शाळेत पाठवू नये, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले आहे.

शिक्षकांची तपासणी करणार : प्रा. वर्षा गायकवाड

 

शाळा सुरू होण्यापूर्वी सर्व शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणी दि. १७ ते २२ नोव्हेंबरदरम्यान स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून करून घेतली जाईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी यावेळी दिली. दि.२३ नोव्हेंबरपासून सुरू होणा-या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे थर्मल चेकिंग करण्यात येईल.

एका विद्यार्थ्यांला एका बेंचवर बसविण्यात येईल, एक दिवसाआड वर्ग भरतील, विद्यार्थ्यांनी घरून जेवण करून यावे, स्वत:ची पाण्याची बाटली सोबत आणावी. चार तासांची शाळा राहील त्यात केवळ विज्ञान, गणित आणि इंग्रजी असे कठीण विषय शिकवले जातील. या विषयांसह बाकी विषयांसाठी ऑनलाईन वर्गांची सुविधा असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शाळा सुरू करताना टप्प्याटप्प्याने सुरू कराव्या; तसेच शाळा व्यवस्थित सुरू राहाव्या यासाठी स्थानिक प्रशासनाला योग्य त्या सूचना देण्याची विनंती राज्यमंत्री श्री. कडू यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना केली.

शाळा सुरू करण्यासंदर्भातील सविस्तर एसओपी तयार करण्यात आली असून स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्यात येतील, असे अप्पर मुख्य सचिव श्रीमती कृष्णा यांनी सांगितले.

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेमुळे संसर्गाचा वेग रोखण्यात यश

 

कोरोना वाढीचा दर तसेच मृत्यू दर कमी होताना दिसत असले तरी गाफील न राहता युरोपप्रमाणे दुस-या लाटेचा मुकाबला करण्याची तयारी राहू द्या. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेमुळे आपण संसर्ग रोखण्यात काही प्रमाणात यशस्वी झालो असून डिसेंबरमध्येही ही मोहीम परिणामकारकपणे राबविण्याचे नियोजन करा अशा सूचना प्रशासनास दिल्या. दिवाळीनंतर पुढचे १५ दिवस जागरुकतेचे आहे, त्यादृष्टीने सावधानता बाळगा आणि मास्क लावणे, सुरक्षित अंतर राखणे, हात वारंवार धुणे या नियमांचे पालन नागरिक करतील हे काटेकोरपणे पाहा, असेही ते म्हणाले.

आज मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत संवाद साधला आणि कोविडसंदर्भात उपाययोजनांची माहिती करून घेतली. आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे सल्लागार डॉ. दीपक म्हैसेकर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, टास्क फोर्सचे डॉक्टर्स सहभागी झाले होते.

मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, हे वर्ल्ड वॉर आहे असे मी मार्च महिन्यात म्हणालो होतो, इतक्या महिन्यांमध्ये आपण हत्यार नसतानासुद्धा विषाणूवर काबू मिळविण्यासाठी लढलो आणि आपल्याला यश येत आहे असे दिसते. या विषाणूचा जेव्हा चंचूप्रवेश झाला तेव्हा आपण लॉकडाऊन केले आणि आता हळूहळू सर्व खुले करू लागलो आहे. त्यामुळे सुरुवातीला शहरात असलेला संसर्ग आता राज्यभर सर्वत्र पसरलाय. सुरुवातीच्या काळात विषाणूचा प्रसार मर्यादित ठिकाणी होता, मात्र आता ग्रामीण भागातसुद्धा रुग्ण सापडत आहेत. या सर्व कालावधीत उन्हाळा आणि पावसाळ्यात मोसमी आजार आढळले नाहीत, कारण आपण आरोग्यविषयक खबरदारी घेतली. मात्र आता थंडी आली आहे. या काळात कोविड व्यतिरिक्त इतर आजारही उफाळून येतात. विशेषत: ह्रदयविकार, न्यूमोनिया, अस्थमा, फ्ल्यू यासारख्या रुग्णांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. फ्ल्यू आणि कोरोनातील फरकही कळला पाहिजे.

सुपर स्प्रेडर्सच्या चाचण्या आवश्यक

 

सर्व काही खुले केल्याने विशेषत: शासकीय कार्यालयात गर्दी वाढू लागली आहे. ती कमी करणे, त्यासाठी काही कल्पक उपक्रम राबविणे गरजेचे आहे. जनतेच्या खूप जास्त संपर्कात येणारे लोक, बस चालक-वाहक, सार्वजनिक व्यवस्थेतील कर्मचारी हे सुपर स्प्रेडर्स असू शकतील. त्यामुळे त्यांच्या चाचण्या लगेच करून घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

कोविड सुविधा काढून टाकू नका

 

महाराष्ट्राचा आरोग्य नकाशा या मोहिमेच्या निमित्ताने तयार झाला आहे. मोहिमेत सापडलेल्या सहव्याधी नागरिकांच्या संपर्कात राहणे गरजेचे आहे. त्यांची सातत्याने चौकशी करा. त्यामुळे दुसरी लाट आली तरी मोठी आपत्ती टाळू शकू, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, सध्या फिल्ड हॉस्पिटल किंवा कोविड केअर केंद्राच्या उभारण्यात आलेल्या सुविधा काढून टाकू नका. आपल्याला थोडा वेळ मिळाला आहे. त्यामुळे काही उणीवा असतील त्या दूर करण्याचा प्रयत्न करा, वैद्यकीय यंत्रणेला प्रशिक्षित करा, विभागवार डॉक्टर्सचा आढावा घ्या. कर्मचारी कमी करू नका. थोडी विश्रांती द्या पण तात्पुरत्या सुविधा कायमस्वरूपी होतील का हे पहा असेही ते म्हणाले.

काटेकोर कारवाई करा

 

शहरी आणि ग्रामीण भागात स्वॅब (घशातील द्राव) संकलन केंद्रे वाढवा, चाचण्या कमी करू नका. दुस-या लाटेची तयारी करा, कर्मचारी व सुविधा यांची तयारी करून ठेवा. लस डिसेंबरअखेर किंवा एप्रिलमध्ये येईल असा अंदाज आहे. मात्र तोपर्यंत मास्क, हात धुवा, सुरक्षित अंतर हे नियम पाळले गेलेच पाहिजेत. मास्क न वापरणा-यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, प्रार्थनास्थळांना उघडण्याच्या बाबतीतही दिवाळीनंतर निर्णय घेऊ. मंदिरांमध्ये ज्येष्ठ नागरिक नियमितपणे जातात. हा विषाणू ज्येष्ठ आणि सहव्याधी रुग्णांना अधिक धोकादायक असल्याने याबात अधिक काळजी घेऊन निर्णय घ्यावा लागत आहे, असेही ते म्हणाले.

प्रशिक्षित आयसीयू कर्मचारी असणे गरजेचे

 

डॉ. राजेश टोपे म्हणाले, माझे कुटुंब मोहिमेधील डेटा हा दुसरी लाट आली तर उपयुक्त ठरेल. कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणावर पसरविणा-या समाजातील व्यक्तींच्या चाचण्या मोठ्या प्रमाणावर करून घ्याव्या लागतील. आज आपल्याकडे ५०० प्रयोगाशाळा असताना चाचण्यादेखील वाढल्या पाहिजेत. काही जिल्ह्यांत एंटीजेनच्याऐवजी आरटीपीसीआर चाचण्यांवर अधिक भर द्यावा लागेल. गृह विलगीकरणमध्ये असलेल्या रुग्णांकडे अधिक लक्ष द्यावे लागेल. काही जिल्ह्यात अजून मृत्यू दर जास्त आहे. त्यामुळे प्रशिक्षित आयसीयू कर्मचारी असणे गरजेचे आहे. या कर्मचा-यांना प्रशिक्षणाचा कार्यक्रम तयार करून जिल्हाधिकारी यांनी ते करून घ्यावे. मास्क, औषधी, चाचण्यांचे दर यावर शासनाने नियंत्रण आणले आहे. जिथे हे पाळले जात नसेल तिथे काटेकोर कारवाई करणे गरजेचे आहे.

मोहिमेमुळे ५० हजार कोविड रुग्ण आढळले

 

आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी माहिती देताना सांगितले की, माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेमुळे राज्यात ५० हजारपेक्षा जास्त कोविड रुग्ण आढळले आहेत. शिवाय सह व्याधी रोग्यांची माहिती पण शासनाकडे आहे. त्यावर अधिक लक्ष केंद्रित करून कोरोना संसर्ग त्यांना होऊ नये म्हणून विशेष काळजी घेण्यात येईल. नंदुरबारसारख्या दूरच्या जिल्ह्यातदेखील मोबाईल ॲपचा चांगला वापर करून माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहीम राबविण्यात आली. दुसरी लाट आली तर ४० टक्के रुग्ण विलगीकरणात तर ४५ टक्के कोविड केंद्रात असतील तर १५ टक्के रुग्णांना आयसीयूची गरज असेल अशी अपेक्षा आहे. आजमितीस केवळ १ लाख सक्रिय रुग्ण असून दररोज २४ हजार रुग्ण असायचे तिथे आता ५ ते ६ हजार रुग्ण आढळत आहेत. रिकव्हरी रेट ९१ टक्के इतका आहे अशी माहितीही त्यांनी दिली. मुख्य सचिव संजय कुमार म्हणाले, माझे कुटुंब, माझी जबाबदारी यामध्ये आपल्याकडे डेटा जमा झाला आहे, त्याचा वैद्यकीय कारणांसाठी चांगला उपयोग करून घेता येईल.

खाद्य विक्रेते , उपहारगृहे यांनी नियम पाळणे गरजेचे

मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता म्हणाले, शासकीय कार्यालयांत गर्दी मोठ्या प्रमाणावर दिसत असून अशी ठिकाणी सुपर स्प्रेडर ठरू शकतात. त्यामुळे याठिकाणी नाविन्यपूर्ण कल्पना राबवून गर्दी होऊ देऊ नका. शहरांत रस्त्यावर खाद्य विक्रेते, उपहारगृहे यांत गर्दी वाढू लागली आहे तिथेही नियम पाळण्याची गरज आहे.

मुख्यमंत्र्यांचे सल्लागार डॉ. दीपक म्हैसेकर म्हणाले, गडचिरोलीत रुग्ण संख्या सप्टेंबरच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये दुप्पट झाली आहे . नंदुरबार आणि धुळे येथे अधिक चाचण्या वाढणे गरजेचे आहे. दिल्लीत कोविडची परिस्थिती हवेच्या प्रदूषणामुळे वाढली आहे त्यामुळे संसर्ग वाढला आहे.

यावेळी बोलताना अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे म्हणाले, साधारण ९ महिने झाले कोविडशी लढाई सुरु आहे. अनेक निकषांवर चांगली कामगिरी होत आहे पण आता अधिक आव्हाने आहेत. युरोपात दुस-या लाटेची सुरुवात झाली असून दिल्ली व इतर काही राज्यातदेखील दुस-या लाटेची भीती वाटते आहे. अशा परिस्थितीत आपण पुढील काळातले नियोजन केले पाहिजे.

गृह विलगीकरणासाठी खासगी रुग्णालयांची मदत घ्यावी

टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी म्हणाले, दुसरी लाट कधी येईल याविषयी चर्चा सुरु आहे. हिवाळ्यात जिथे जिथे तापमान कमी झाले तिथे, तसेच औद्योगिक भागात कोरोना वाढू शकतो. चाचण्या अधिक वाढविणे तसेच रुग्णांचे जास्तीत जास्त संपर्क शोधणे गरजेचे आहे.
२५ डिसेंबर ते २६ जानेवारी या काळात हृदयविकार, न्यूमोनियाचे प्रमाण एरव्ही देखील जास्त असते त्यामुळे डॉक्टर्स आणि रुग्णांचे देखील यासंदर्भात योग्य ते लोकशिक्षण व्हावे. खासगी रुग्णालयांची मदत घेऊन गृह विलगीकरण नियोजन करावे. डॉ. राहुल पंडित म्हणाले, दुसरी लाट आली तर अतिदक्षता विभागातील डॉक्टर्स आणि कर्मचारी यांच्यावर ताण येऊ शकतो. त्यादृष्टीने नियोजन करावे. प्रशासनाने मास्क घालण्यासंदर्भात अधिक काटेकोर निर्बंध घालावेत. कोरोना काळात कोविड केंद्र आपण बंद करीत असलो, तरी सरसकट बंद न करता कुठली बंद करावीत, कुठली करू नये, याचे व्यवस्थित नियोजन करावे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी