30 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeराजकीयउद्धव ठाकरेंचा फडणवीसांना फोन

उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना फोन

टीम लय भारी

मुंबई : गेल्या ८ दिवसांपासून राज्यात राजकीय सत्तेचा खेळ सुरु आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत ४५ पेक्षा अधिक आमदार स्वतःच्या गटात सहभागी करून घेतले. तर हळूहळू सेनेचे उर्वरित आमदार सुद्धा ते आपल्या गटात सामील करून घेत आहेत. त्यामुळे शिवसेनेला लागलेली आमदारांची गळती थांबण्याचे काही नाव घेत नाहीये.

२१ जूनला महाराष्ट्रातील सत्तानाट्याला सुरुवात झाली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अस्थिर झाले आहे. आघाडी सरकार कधीही कोसळू शकते, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सरकार धोक्यात आहे हे कळताच त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना फोन केल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. सरकार वाचविता यावे, यासाठी उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधला असल्याची माहिती समोर येत आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या पक्षश्रेष्ठींशी देखील संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. उद्धव ठाकरेंनी अमित शहा किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संपर्क साधल्याचे म्हंटले जात आहे. परंतु त्यांचा हा संपर्क होऊ शकला नाही. अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये सरकारच्या अस्थिरतेविषयी बोलण्यात आले. पक्षामध्ये विभाजन होण्यापेक्षा एकत्र येऊन पुन्हा युती होऊ शकते का? यासाठीच उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना फोन केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. २१ जून ला ठाकरेंनी फडणवीसांशी संपर्क साधल्यानंतर पुन्हा त्यांच्यात संपर्क झाल्याचीही माहिती समोर आली आहे.

हे सुद्धा वाचा :

राजकारणाच्या वादळात मराठी अभिनेत्यांनी घेतली उडी

आदित्य ठाकरेंनी घेतली प्रसाद सावंत यांची रुग्णालयात भेट

सरकार अस्थिर, बदल्यांसाठी ‘किंमत’ मोजलेले अधिकारी हवालदिल

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी