‘लय भारी’च्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. ‘लय भारी’चे व्यवस्थापकीय संपादक तुषार खरात (Tushar Kharat) यांना प्रतिष्ठेचा अरविंदबाबू देशमुख पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला आहे. नागपूरमधील अरविंदबाबू देशमुख प्रतिष्ठानतर्फे पत्रकारितेच्या माध्यमातून समाजात जनजागृती करणाऱ्या तसेच वंचित समाजघटकांचा जीवनस्तर उंचावण्यासाठी योगदान देणाऱ्या पत्रकारांना हे पुरस्कार दिले जातात. खरात यांना डिजीटल माध्यमातील ‘लय भारी’ कामगिरीसाठी हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
संजय आवटे, नीलेश खरे, देवेंद्र गावंडे, विश्वास वाघमोडे, मेघना ढोके आदींचाही माध्यमातील उत्कृष्ट कामगिरीसाठी गौरव केला जाणार आहे. याशिवाय, दिवंगत दिनकर रायकर यांच्या कारकीर्दीचाही ‘जीवनगौरव’ने सन्मान केला जाणार आहे. एक लाख रुपये, मानचिन्ह, मानपत्र असे मुख्य पुरस्काराचे स्वरूप आहे. याशिवाय, विविध क्षेत्रात काम करणाऱ्या सत्कारमूर्तींनाही रोख राशी, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येईल. ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे. शुक्रवार, 3 फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजता नागपुरातील व्हीआयपी रोडवर असलेल्या धरमपेठमधील वनामती सभागृहात पुरस्कार वितरण कार्यक्रम होईल. अरविंदबाबू देशमुख पत्रकारिता पुरस्कार समितीचे अध्यक्ष, माजी मंत्री रणजितबाबू देशमुख हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील.


अरविंदबाबू देशमुख प्रतिष्ठानचे 2020 या वर्षासाठीच्या या पुरस्कारांचे वितरण कोविडच्या साथीमुळे लांबणीवर पडले होते. दरम्यानच्या काळात प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झालेले ‘लोकमत’चे सल्लागार संपादक दिनकर रायकर यांचे निधन झाले. त्यांच्या कारकीर्दीचा आता मरणोत्तर सन्मान केला जाणार आहे. ‘लय भारी’चे व्यवस्थापकीय संपादक तुषार खरात यांना ई-मीडियातील उत्कृष्ट कामगिरीसाठी तर ‘लोकमत’च्या पुणे आवृत्तीचे संपादक संजय आवटे यांना मुद्रित माध्यमातील उत्कृष्ट कामगिरीसाठी विशेष पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. प्रतिष्ठानचे सदस्य व अरविंदबाबू देशमुख पत्रकारिता पुरस्कार समितीचे कार्याध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. आशिष देशमुख, कार्यवाह प्रा. जवाहर चरडे आणि संयोजक मनोज जवंजाळ यांनी ही माहिती कळविली आहे.


पुरस्कारप्राप्त अन्य मान्यवर असे –
- नीलेश खरे (संपादक – झी 24 तास, इलेक्ट्रॉनिक माध्यमातील उत्कृष्ट कामगिरी)
- विश्वास वाघमोडे (इंडियन एक्स्प्रेस – मुंबई, उत्कृष्ट शोधपत्रकारिता)
- राधेश्याम जाधव (हिंदू बिझनेस लाइन – पुणे, सर्वोत्कृष्ट कृषि पत्रकारिता)
- देवेंद्र गावंडे (लोकसत्ता – नागपूर, सर्वोत्कृष्ट सामाजिक पत्रकारिता)
- मेघना ढोके (लोकमत – नाशिक, सर्वोत्कृष्ट महिला पत्रकार)
- महेंद्र महाजन (सकाळ – नाशिक, सर्वोत्कृष्ट कोरोना आरोग्यविषयक वृत्तांकन)



‘लय भारी’ पोर्टलविषयी …
‘लय भारी’ने डिजिटल मीडिया क्षेत्रात तीन वर्षांपूर्वी पाऊल टाकले. त्यानंतर एक वर्षापूर्वी म्हणजे जानेवारी 2022 मध्ये ‘लय भारी मीडिया प्रायव्हेट लिमिटेड’ या खासगी कंपनीची स्थापना करण्यात आली. अल्पावधीतच जनहिताचे अनेक विषय ‘लय भारी’ने मांडले. मंत्रालय, प्रशासकीय आणि आधिकारी वर्तुळात ‘लय भारी’ने विश्वासार्हता निर्माण केली. अलीकडेच, बागेश्वर धाम येथील धीरेन्द्र शास्त्री महाराज यांनी केलेल्या जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या बदनामीचा विषय मराठी माध्यमात ‘लय भारी’ने सर्वप्रथम मांडला. सरकारच्या जनहितविरोधी धोरण तसेच बेबंद कारभाराबाबत कोणत्याही दबावाला न जुमानता निर्भीड आणि नि:पक्ष लिखाणात कोणतीही कसूर न ठेवतानाच सरकारच्या चांगल्या कार्याचे कौतुकही ‘लय भारी’ने नेहमीच केले आहे. “भारतीय स्वातंत्र्यानंतरचे राजकारण @75” या दर्जेदार दिवाळी विशेषांकाचे सर्वानीच कौतुक केले होते.
हे सुद्धा वाचा :
‘लय भारी’चे व्यवस्थापकीय संपादक तुषार खरात यांना यशवंत रत्न पुरस्कार
Exclusive : ‘लय भारी’च्या तडाख्यानंतर सरकारने जारी केले 355 कोटी रुपये
लय भारीने सर्वप्रथम मांडलेले आकाशवाणी स्थलांतर, वसुलीभाई सत्तारभाईचे प्रश्न अधिवेशनात गाजले
‘लय भारी’च्या कार्यालयाचा शुभारंभ; बाळासाहेब थोरात – धनंजय मुंडेंनी केले तोंड भरून कौतुक