35 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
HomeमुंबईCyclone Nisarga : मुंबईत पाऊस, बीकेसीच्या कोविड सेंटरला चक्रीवादळाचा धोका; रुग्णांना हलवले!

Cyclone Nisarga : मुंबईत पाऊस, बीकेसीच्या कोविड सेंटरला चक्रीवादळाचा धोका; रुग्णांना हलवले!

टीम लय भारी

मुंबई : पावसाने आज मुंबईसह (Nisarga Cyclone in Mumbai) उपनगरात हजेरी लावली असून ठाणे, पालघर, मुंबई आणि रायगडच्या काही ठिकाणी पावसाला सुरूवात झाली आहे. मुंबईसह कोकण किनारपट्टीवर निसर्ग चक्रीवादळ धडकण्याची शक्यता हवामान खात्याने (Cyclone Nisarga live update) वर्तवली आहे.

अरबी समुद्रात जे कमी दाबाचे क्षेत्र होते त्याने आता चक्रीवादळाचे रुप धारण केले आहे. पुढच्या बारा तासांमध्ये हे चक्रीवादळ आणखी तीव्र होणार असल्याचे मुंबईच्या हवामान विभागाच्या दक्षता अधिकारी शुभांगी भुते यांनी सांगितले.


बीकेसीच्या कोविड सेंटरला चक्रीवादळाचा धोका; रुग्णांना हलवले!

निसर्ग चक्रीवादळाचा वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथील कोविड सेंटरलाही धोका असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे या कोविड सेंटरमधील कोरोनाबाधित रुग्णांना इतर ठिकाणी हलविण्यात येत असून आतापर्यंत ६० रुग्णांना वरळी येथील कोविड सेंटरमध्ये नेण्यात आले आहे. तर काहींना गोरेगाव येथील कोविड सेंटरमध्ये नेण्यात येत आहे. बीकेसीतील कोविड सेंटरमधील इतर वैद्यकीय सुविधाही सुरक्षित ठेवण्याची तयारी करण्यात आली आहे.

Cyclone Nisarga : मुंबईत पाऊस, बीकेसीच्या कोविड सेंटरला चक्रीवादळाचा धोका; रुग्णांना हलवले!
बीकेसीच्या कोविड सेंटरला चक्रीवादळाचा धोका  असल्याने रुग्णांना अन्यत्र हलवले.

हवामान खात्याने आज दिलेल्या ताज्या माहितीनुसार, आता हे वादळ अलिबागला धडकणार आहे. त्यामुळे अलिबागला एनडीआरएफच्या चार टीम तैनात करण्यात आल्या आहेत.

निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहेत. मुंबईसह पालघर, डहाणू, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या ठिकाणीही एनडीआरएफची पथके तैनात करण्यात आली आहेत. याशिवाय काही ठिकाणी नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.

मुंबईसह कोकण किनारपट्टीवर निसर्ग चक्रीवादळ घोंघावण्याची शक्यता असल्याने या वादळाला तोंड देण्यासाठी मुंबई अग्निशमन दल आणि नौदलाने कंबर कसली आहे. अग्निशमन दलाने मुंबईतील सहाही महत्त्वाच्या चौपाट्यांवर जीवरक्षक तैनात केले आहेत. तर नौदलाने अरबी समुद्रात नौका तैनात ठेवल्या आहेत.

गिरगाव, वर्सोवा, दादर, जुहू, आक्सा आणि गोराई या मुंबईतील सहा प्रमुख चौपाट्या आहेत. बुधवारी चक्रीवादळ मुंबईत धडकणार असल्याने या सहाही चौपाट्यांवर अग्निशमन दलाने ९३ जीवरक्षक आणि १५० पूर नियंत्रक टीमच्या सदस्यांना तैनात ठेवले आहे. तसेच या सहाही चौपाट्यांवर बोटींसह नैसर्गिक संकटापासून बचावासाठीच्या सर्व गोष्टी तैनात केल्या आहेत. तसेच पुढील तीन दिवस कुणालाही चौपाट्यांकडे फिरण्यास मनाई केली आहे.


नौदलही सज्ज

Cyclone Nisarga : मुंबईत पाऊस, बीकेसीच्या कोविड सेंटरला चक्रीवादळाचा धोका; रुग्णांना हलवले!
मुंबईच्या किनारपट्टीला निसर्ग चक्रीवादळाचा धोका असल्याने या वादळाचा सामना करण्यासाठी नौदलाची टीमही सज्ज झाली आहे.

मुंबईच्या किनारपट्टीला निसर्ग चक्रीवादळाचा धोका असल्याने या वादळाचा सामना करण्यासाठी नौदलाची टीमही सज्ज झाली आहे. वादळाच्या पार्श्वभूमीवर नौदलाच्या पश्चिम कमांडमधील सर्व महत्त्वाच्या नौका अरबी समुद्रात किनारपट्टी भागात तैनात करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांची सुटका करण्यासाठी सर्व साधनेही सज्ज ठेवण्यात आली आहे.


पालिकेकडून निवा-याची सोय

निसर्ग चक्रीवादळाचा धोका टाळण्यासाठी जी /उत्तर विभागातर्फे दादर/माहीम किना-यालगत राहणा-या लोकांसाठी मुंबई महापालिकेने राहण्याची व्यवस्था केली आहे. दादर विभागाकरिता गोखले रोड मनपा शाळा व भवानी शंकर मनपा शाळा आणि माहीम करिता न्यू माहीम मनपा शाळेमध्ये राहण्याची सोय करण्यात आली आहे. तरीही आवश्यकता भासल्यास त्यांनी सदर शाळांमध्ये स्थलांतरित व्हावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.

वादळाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळानेही खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहेत. झाड आणि विजेच्या खांबाजवळ एसटी थांबवू नका. डिझेल टाकीमध्ये पाणी जमू नये म्हणून टाक्यांची झाकणे लावा. तसेच जबाबदार पर्यवेक्षकांनी आगारात थांबावे आणि जिल्हाधिकारी किंवा पोलिसांकडून गाड्यांची मागणी झाल्यास त्यांना तात्काळ गाड्या द्याव्यात अशा सूचना एसटी महामंडळाने संबंधित अधिकारी आणि कर्मचा-यांना केल्या आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी