29 C
Mumbai
Friday, December 1, 2023
घरराष्ट्रीयहरित क्रांतीचे जनक स्वामीनाथन यांचं निधन

हरित क्रांतीचे जनक स्वामीनाथन यांचं निधन

भारतीय हरित क्रांतीचे जनक अशी ओळख असलेले एम. एस. स्वामीनाथन यांचं निधन झाले आहे. ते ९८ वर्षांचे होते. चेन्नईमध्ये त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला. शेतीतज्ज्ञ, शेतीअर्थतज्ज्ञ, वनस्पती अनुवंशशास्त्रज्ञ ही स्वामीनाथन यांची ओळख होती. अल्प उत्पन्न गटातील शेतकऱ्यांसाठी तांदळाच्या विविध प्रकारच्या सर्वाधिक उत्पादन देणाऱ्या प्रजाती तयार करण्यात एम. एस. स्वामीनाथन यांनी महत्त्वाचं काम केले होते. १९६० च्या दशकात भारतात हरित क्रांती घडवण्यात स्वामीनाथन यांची मोलाची भूमिका होती. त्यामुळे त्यांच्या निधनाने देशाने एक महान सुपुत्र गमावल्याची खंत व्यक्त होत आहे. त्यांच्या या कार्याचा भारत सरकारने यथोचित गौरवही केला होता. केंद्र सरकारने स्वामीनाथन यांचा पद्मश्री, पद्मभूषण व पद्मविभूषण या किताबांनी सन्मानित केले होते. स्वामीनाथन यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केले आहे.

स्वामीनाथन यांची २००४ मध्ये राष्ट्रीय शेतकरी आयोगाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. स्वामीनाथन यांची कारकिर्द कायम भारतीयांच्या स्मरणात राहील अशीच आहे. १९६१ ते १९७२ या कालावधीत त्यांनी भारतीय कृषी संशोधन संस्थेचे संचालक म्हणून काम पाहिले. त्यानंतर १९७२ ते १९७९ या काळात ते आय.सी.ए.आर.चे महासंचालक आणि केंद्रीय कृषीय विभागाचे सचिव होते. पुढे १९८० ते १९८२ हे तीन वर्षे ते नियोजन आयोगाचे उपसंचालक आणि त्यानंतर सदस्य  होते. १९८२ नंतर सात वर्षे त्यांनी इंटरनॅशनल राईस रिसर्च इन्स्टिट्युटचे महासंचालकपददेखील भूषवले.

एम. एस. स्वामीनाथन यांचा पहिला जागतिक अन्न पुरस्काराने १९८७ मध्ये गौरव करण्यात आला होते. याशिवाय १९७१मध्ये रॅमन मॅगसेसे पुरस्कार तसेच १९८६ मध्ये अल्बर्ट आईनस्टाईन वर्ल्ड सायन्स अवॉर्डने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. स्वामीनाथन यांनी शेतीचा आणि शेतीविकासाचा इतका ध्यास घेतला होता की १९८७ नंतर त्यांनी चेन्नईमध्ये एम. एस. स्वामीनाथन रिसर्च फाऊंडेशनची स्थापनाही केली होती.

एम. एस. स्वामीनाथन यांच्या निधनानंतर सामान्य शेतकऱ्यांसह राजकीय नेते, सामाजिक क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे. स्वामीनाथन यांच्या निधनामुळे झालेले नुकसान कधीही भरून येणार नाही, या शब्दांत राहुल गांधी यांनी शोक व्यक्त केला आहे.

वाढत्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमुळे २००४ मध्ये केंद्र सरकारने राष्ट्रीय शेतकरी आयोगाची स्थापना केली होती. या समितीच्या अध्यक्षपदी स्वामीनाथन यांची नियुक्ती करण्यात आली होती. आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या स्थितीचा अभ्यास करणे, त्यांच्या समस्या, त्यावर उपाययोजना याचा अभ्यास करण्यासाठी या आयोगाची स्थापना केली होती. स्वामीनाथन आयोगानं २००६ मध्ये त्यांचा सविस्तर अहवाल केंद्र सरकारला सादर केला. या अहवालात, शेतमालासाठी मिळणारा हमीभाव हा मालाच्या उत्पादनाच्या खर्चाच्या किमान दुप्पट असावा, अशी शिफारस स्वामीनाथन आयोगाने केली होती. शेती उद्योगात अत्यंत मोलाची कामगिरी करणाऱ्या या भारतमातेच्या महान सुपूत्राच्या निधनामुळे भारतीय शेतकऱ्यांचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे.

हे ही वाचा

रोहित पवारांच्या बारामती अ‍ॅग्रोला पहाटे २ वाजता नोटीस, ७२ तासांत प्लांट बंद करा

शिवाजी महाराजांची वाघनखे लंडनहून १६ नोव्हेंबरला भारतात येणार, सुधीर मुनगंटीवारांचे प्रयत्न फळाला

मराठी महिलेला जागा नाकारण्यावरून सेना-मनसेत चिखलफेक!

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी