26 C
Mumbai
Friday, December 1, 2023
घरराजकीयफडणवीसांच्या प्रतिमेसाठी भाजपचा व्हिडीओ

फडणवीसांच्या प्रतिमेसाठी भाजपचा व्हिडीओ

राज्यात मराठा आरक्षणावरून आंदोलन सुरु झाल्यापासून राज्याचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र राज्य भाजपचे चाणक्य देवेंद्र फडणवीस यांची मराठा समाजात प्रतिमा मलीन झाली आहे. एकीकडे मराठा समाजाचे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत, तर दुसरीकडे मराठा समाजाचेच अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे एक ब्राम्हण मराठा आरक्षणात खोडा टाकण्याचे काम करत असल्याची भावना मराठा समाजात बळावली आहे. त्यामुळेच की काय दोन दिवसांपूर्वी अंतरवली सराटी येथे पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे-पाटील यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली. ही टीका फडणवीस यांच्या जिव्हारी लागल्याचे त्यांच्या बॉडी लँग्वेज वरून निदर्शनास येत होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता फडणवीस यांची प्रतिमा संवर्धन करणारा व्हिडीओ भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट केला आहे.

मनोज जरांगे-पाटील यांनी पहिले उपोषण आपल्याच अंतरवली सराटी गावात सुरु केले. याची माध्यमात फारशी चर्चा झाली नाही. पण हे आंदोलन चिरडण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आल्यावर राज्यातील मराठा समाज पेटून उठला. संशयाची सुई गृहमंत्री फडणवीस यांच्या दिशेने आली आणि फडणवीस हे मराठा आंदोलनाचे व्हिलन ठरले. जरांगे यांच्या पहिल्या उपोषणाच्या वेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी मंत्री गिरीश महाजन, संदीपान भुमरे, उदय सामंत, खासदार अर्जुन खोतकर आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांना जरांगे यांची समजूत काढायला पाठवले. राज्य सरकारकडून जरांगे यांची मनधरणी सुरु असतानाच, देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लांब ठेवले. अजित पवार यांनी तर मुख्यमंत्र्यांबरोबरच्या पत्रकार परिषदेत फडणवीस यांची पाठराखण करत, पोलिसांना फडणवीस यांनी लाठीचार्जचे आदेश दिले नसल्याचे स्पष्ट केले. तरीही मराठा समाजाचा फडणवीस यांच्यावरील राग काही कमी होत नव्हता.

ऑगस्ट महिन्यात जरांगे-पाटील उपोषणाला बसले होते. हे उपोषण १७ दिवस चालले. त्यांनतर त्यांनी सरकारला ४० दिवस दिले आणि ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात ते पुन्हा उपोषणाला बसले. सलग नऊ दिवस अन्न आणि पाण्याविना सुरु असलेल्या या उपोषणामुळे त्यांची प्रकृती ढासळत होती, त्यामुळे सरकारने बुधवारी सर्वपक्षीय बैठक घेत यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. मराठ्यांना न्यायालयात टिकेल असे आरक्षण द्यायचे आहे, अशी भूमिका सरकारची असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. त्यानुसार गुरुवारी दोन निवृत्त न्यायाधीश सुनील शुक्रे, एम.जी. गायकवाड राज्य मागासवर्ग आयोगाचे माजी अध्यक्ष आणि अनेक मंत्री उपोषणस्थळी पोहचले आणि त्यांनी जरांगे यांना कायदा काय म्हणतो आणि वास्तव काय याची जाणीव करून दिली. शिवाय ८ डिसेंबर रोजी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात याबाबतचा ठराव मांडला जाईल असे आश्वासन दिल्यांनतर जरांगे यांनी उपोषण मागे घेतले.

हे ही वाचा

‘ड्रग्ज पुरवठादार एकनाथ शिंदेंच्या जोडीला’

अंतरवाली सराटीत काल काय घडलं?

डॉ. ओमप्रकाश शेटे आयुष्मान भारत अभियानाचे नवीन कक्ष प्रमुख

जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी दोनदा उपोषण केले. या दोन्ही आंदोलनात मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांना दूर ठेवले. या मागे कारण होते मराठा समाजाला असलेला फडणवीस यांच्या बाबतचा राग. ‘ तो जन्माने ब्राम्हण, कर्माने मराठा, मनाने ओबीसी, दिलदार धनगर, कणखर आदिवासी,शूरवीर बंजारा….. जाती-गोत्रात, धमन्यात वाहत आहे.’ अशी नाट्यमय सुरुवात असलेल्या या व्हिडीओ क्लीपमध्ये फडणवीस यांनी मराठा समाजासाठी काय काय केले आहे. याचा पाढा वाचला आहे. हे करत असताना शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी मराठा तरुणांना कसे झुंजवत ठेवले, हे दाखवण्याचा प्रयत्न केला. या क्लीपमध्ये राज्य सरकारच्या सहकार्याने हे फडणवीस यांनी केले. याचा एकदाही उल्लेख नाही. त्यामुळॆ या फडणवीसांची प्रतिमा संवर्धन क्लीपमध्ये फडणवीस एके फडणवीस दिसत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी