महात्मा गांधींच्या विचारांमुळे किंवा दुराग्रहामुळे एका महान व्यक्तीवर अन्याय झाला. ती महान व्यक्ती म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस. सुभाषचंद्र बोस यांचा जन्म ओरिसातील एका मोठ्या बंगाली कुटुंबात झाला होता. भारतीय नागरी सेवा परीक्षा देण्यासाठी त्यांना इंग्लंडला पाठवण्यात आले. परीक्षेत ते यशस्वी झाले. परंतु राष्ट्रवाद हा उच्च दर्जाचा असल्याचे कारण देत त्यांनी अंतिम परीक्षा दिली नाही. महात्मा गांधी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय चळवळीत सामील होण्यासाठी १९२१ मध्ये भारतात परत आले. बोस हे जवाहरलाल नेहरू यांचे नेतृत्व असलेल्या गटात गेले. हा गट घटनात्मक सुधारणेसाठी कमी उत्सुक होता आणि समाजवादासाठी अधिक खुला होता. नेताजी आपल्या कामगिरीवर १९३८ मध्ये काँग्रेसचे अध्यक्ष झाले. १९३९ मध्ये पुन्हा निवडून आले. पण पुढे त्यांच्यात आणि महात्मा गांधींमध्ये मतभेद झाले.
काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी गांधींना पाठिंबा दिला. त्यानंतर बोस यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. किंबहुना सुभाषबाबूंना मिळालेले अध्यक्षपद महात्मा गांधींना मान्य नव्हते. त्यामुळे त्यांनी समांतर यंत्रणा उभी केली. अध्यक्ष असूनही सुभाषबाबूंना कार्यरत राहाणे शक्य नव्हते म्हणून त्यांनी राजीनामा दिला आणि काँग्रेस सोडली. महात्मा गांधींनी सुभाषबाबूंना काँग्रेस सोडण्यास मजबूर केले हा एक फार मोठा गांधी विचारांवर आक्षेप आहे.
त्याचप्रमाणे २६ जानेवारी १९३१ च्या दिवशी, कलकत्त्यात सुभाषबाबू तिरंगी ध्वज फडकावत एका विराट मोर्चाचे नेतृत्व करत होते. तेव्हा पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्यात ते जखमी झाले. सुभाषबाबू तुरुंगात असताना, गांधींजीनी इंग्रज सरकारबरोबर तह केला व सर्व कैद्यांची सुटका करण्यात आली. परंतु सरदार भगतसिंग आदी क्रांतिकारकांची सुटका करण्यास इंग्रज सरकारने नकार दिला. भगतसिंगांची फाशी रद्द करावी ही मागणी गांधींजीनी इंग्रज सरकारकडे करावी अशी सुभाषबाबूंची मागणी होती. याबाबतीत इंग्रज सरकार जर दाद देत नसेल, तर गांधींजीनी सरकारबरोबर केलेला करार मोडावा, असे सुभाषबाबूंचे मत होते. पण आपल्या बाजूने दिलेला शब्द मोडणे गांधींजीना मान्य नव्हते. इंग्रज सरकारने आपली भूमिका सोडली नाही व भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांना सुखदेव, राजगुरू यांना फाशी देण्यात आले. भगतसिंगांना वाचवू न शकल्यामुळे सुभाषबाबू, गांधींजींवर नाराज झाले. तो नाराजांचा फार मोठा गट, विचार आजही दिसून येतो. हातात असतानाही महात्मा गांधींनी भगतसिंगांना वाचवले नाही याचा राग पंजाबातही कायम राहिला आहे.
हे सुद्धा वाचा
महात्मा गांधी यांच्यामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना संविधान लिहिण्याची संधी मिळाली होती (भाग -२ )
पंडित नेहरूंच्या तुलनेत नरेंद्र मोदी सुमार दर्जाचे (भाग ४)
पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यामुळे लोकशाहीची पायाभरणी (भाग ३)
महात्मा गांधीच्या विरोधात खरंच ब्राह्मण समाज आहे का? (प्रफुल्ल फडके यांचा विशेष लेख – भाग १)
महात्मा गांधी आणि केशव हेडगेवार यांच्यातील नातेसंबंध (प्रफुल्ल फडके यांचा लेख – भाग २)
१९३९ मध्ये जेव्हा नवीन काँग्रेस अध्यक्ष निवडण्याची वेळ आली, तेव्हा सुभाषबाबूंना अध्यक्षपदावर कुणी अशी व्यक्ती हवी होती, जी ह्या बाबतीत कोणत्याही दबावासमोर झुकणार नाही. अशी कोणती दुसरी व्यक्ती समोर न आल्यामुळे, सुभाषबाबू स्वत: पुन्हा काँग्रेस अध्यक्ष बनू इच्छित होते. पण गांधीजींना आता ते नको होते. गांधीजींनी अध्यक्षपदासाठी पट्टाभि सितारामैय्या ह्यांची निवड केली. कविवर्य रवींद्रनाथ टागोर ह्यांनी गांधीजींना पत्र लिहून सुभाषबाबूंनाच पुन्हा अध्यक्ष बनवण्याची विनंती केली. प्रफुल्लचंद्र राय, मेघनाद साहा सारखे वैज्ञानिकही पुन्हा सुभाषबाबूंनाच अध्यक्ष करावे ह्या मताचे होते. पण गांधीजींनी ह्या प्रश्नावर कुणाचेच म्हणणे ऐकले नाही. शेवटपर्यंत तडजोड न होऊ शकल्यामुळे, अनेक वर्षांनंतर, काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवली गेली.
सर्व जण समजत होते की, जेव्हा स्वत: महात्मा गांधीनी पट्टाभि सितारामैय्या ह्यांना साथ दिली आहे, तेव्हा तेच ही निवडणूक आरामात जिंकणार. पण घडले वेगळेच. सुभाषबाबूंना निवडणुकीत १५८० मते मिळाली तर पट्टाभी सितारमैय्यांना १३७७ मते मिळाली. गांधीजींनी विरोध करूनही सुभाषबाबूंनी २०३ मतांनी ही निवडणूक जिंकली. पण निवडणुकीच्या निकालाने पेच मिटला नाही. पट्टाभि सितारामैय्यांची हार ही आपली स्वत:ची हार मानून, गांधीजींनी आपल्या साथीदारांना असे सांगितले की, त्यांना जर सुभाषबाबूंची कार्यपद्धती मान्य नसेल, तर ते काँग्रेसमधून बाहेर पडू शकतात. ह्यानंतर काँग्रेस कार्यकारिणीच्या १४ पैकी १२ सदस्यांनी राजीनामा दिला. पंडित जवाहरलाल नेहरू इथे तटस्थ राहिले व एकटे शरदबाबू सुभाषबाबूंच्या बाजूने उभे राहिले. गांधी नेहरूनी अशाप्रकारे एकमेकांना सावरून घेतले होते. नेहरूंनी नरो वा कुंजरोवा अशीच भूमिका जणू इथे घेतली होती. १९३९ सालचे वार्षिक काँग्रेस अधिवेशन त्रिपुरा येथे झाले. ह्या अधिवेशनाच्या वेळी सुभाषबाबू तापाने इतके आजारी होते, की, त्यांना स्ट्रेचरवर पडून अधिवेशनाला उपस्थित राहावे लागले. गांधीजी ह्या अधिवेशनाला उपस्थित राहिले नाहीत. गांधीजींच्या साथीदारांनी सुभाषबाबूंना बिलकुल सहकार्य केले नाही. अधिवेशनानंतरही सुभाषबाबूंनी तडजोडीसाठी खूप प्रयत्न केले, पण गांधीजी व त्यांच्या साथीदारांनी त्यांचे काही चालू दिले नाही. शेवटी परिस्थिती अशी बनली की सुभाषबाबू काही कामच करू शकत नव्हते. अखेर, एप्रिल २९, १९३९ रोजी सुभाषबाबूंनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. बहुमताने निवडून येऊनही केवळ महात्मा गांधींच्या हट्टाखातर सुभाषबाबूंना काम करू दिले नाही, हे गांधींचे विचार लोकशाहीला मारक नाहीत काय?
ब्राह्मण समाज हा मोठ्या संख्येने लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मानणारा आहे. त्यामुळे महात्मा गांधींनी सुभाषबाबूंवर केलेला अन्याय, लोकशाहीची न लागलेली बूज या समाजाला मान्य नव्हती. ती त्यांनी स्पष्टपणे मांडली. किंबहुना सुभाषबाबूंच्या गूढ मृत्यूनंतरही ते जिवंत आहेत असा संशय होता. त्यावेळी स्वातंत्र्य मिळवताना ब्रिटिशांनी केलेल्या करारात जर सुभाषबाबू भारतात सापडले तर त्यांना ब्रिटिशांच्या हवाली करण्याच्या अटीला महात्मा गांधींनी मान्यता दिली आणि हे स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे सुभाषबाबूंच्या बलिदानाची कदर न करणाऱ्या गांधीजींबाबत मोठ्या प्रमाणात नाराजी होती. अर्थात ती फक्त ब्राह्मण समाजाची नाही तर देशप्रेमी भारतीयांची होती. पण याचा परिणाम इतका भयानक होता की नेताजी सुभाषचंद्र बोस यांना दिलेला भारतरत्न पुरस्कारही काढून घेण्याचा प्रकार झाला. अशा प्रत्येक घटनेला गांधी-नेहरू यांच्या कार्यपद्धतीला जबाबदार धरले गेले.
सरदार वल्लभभाई पटेल आणि पंडित जवाहरलाल नेहरू हे महात्त्मा गांधींचे डावे आणि उजवे खांदे म्हणून ओळखले जात होते. यात सरदार पटेल यांची कामगिरी कितीतरी सरस होती. स्वातंत्र्यानंतर उसळलेल्या दंगलींपासून अनेक संस्थाने विलीन करून हा अखंड भारत जोडण्याचे काम त्यांनी केले होते. त्यामुळे खऱ्या अर्थाने कणखर भारताच्या निर्मितीसाठी पंतप्रधानपदी पोलादी पुरुष बसवण्याची गरज होती. पण पोलादी पुरुषाऐवजी गुलाबी पुरुष गांधींनी पंतप्रधानपदी बसवला हा एक आक्षेप गांधी विचारांवर होता. पण मोठ्यांचा अविचार हाही एक विचार ठरतो तर सामान्यांचा चांगला विचारही जनशक्ती आणि धनशक्तीची ताकद नसल्याने मागे पडतो, हे लोकशाहीचे तेव्हापासून तयार झालेले वैशिष्ट्य म्हणावे लागेल.
हा विषय खूप मोठा आहे, यासाठी असंख्य उदाहरणे आणि घटना आहेत. पण जागेच्या मर्यादेमुळे ते एकाचवेळी मांडणे केवळ आणि केवळ कठीण आहे. पण एकच लक्षात घेतले पाहिजे की, यातून कुठेही ब्राह्मण समाज महात्मा गांधींच्या विरोधात होता असा निष्कर्ष कधीच काढला जाऊ नये. हा समाज स्पष्टवक्ता आणि आपली मते मांडणारा होता. बाकीच्यांनी तो मनात दाबून धरला होता इतकाच. (समाप्त)
‘गांधी – नेहरू यांनी देशाचं खरंच नुकसान केलं का ?’ या नावाने ‘लय भारी’ने नुकताच एक विशेषांक प्रसिद्ध केला आहे. या अंकात राजकीय, सामाजिक, प्रशासकीय, पत्रकारीता इत्यादी क्षेत्रातील ४५ पेक्षा जास्त नामवंत मान्यवरांनी लेख लिहिले आहेत. यांत शरद पवार, राजदीप सरदेसाई, भाऊ तोरसेकर, श्रीराम पवार, यशवंतराव गडाख, तुषार गांधी, राजू परूळेकर, प्रा. एन. जी. राजूरकर, कुमार सप्तर्षी, अशोक चौसाळकर, संजय आवटे, श्रीमंत माने, राजेंद्र साठे, अतुल भातखळकर, माधव भांडारी, आशिष शेलार, विजय वडेट्टीवार, सत्यजित तांबे, चंद्रकांत दळवी, प्रभाकर देशमुख, प्रसाद काथे, बंधुराज लोणे, प्रमोद चुंचूवार, रफिक मुल्ला, प्रफुल्ल फडके, राजन वेळूकर, नाना पटोले, उल्हास पवार, , विश्वास काश्यप, राज कुलकर्णी, राजेश खरात आदींचा समावेश आहे. या अंकातील निवडक लेख आम्ही प्रसिद्ध करीत आहोत. हा विशेषांक खरेदी करण्यासाठी संपादक श्री. तुषार खरात यांच्याशी ९८२१२८८६२२ या क्रमांकावर संपर्क साधावा.