30 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeमहाराष्ट्रअण्णा हजारेंना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी लिहिले पत्र

अण्णा हजारेंना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी लिहिले पत्र

टीम लय भारी

मुंबई : ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याच्या निर्णयावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आक्षेप घेतला होता. अण्णांचा हा आक्षेप खोडून काढण्यासाठी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्र लिहिले आहे. ( Hasan Mushrif written a letter to Anna Hajare )

त्र्याहत्तरावी घटनादुरूस्ती, उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय, निवडणूका घेता येत नाहीत अशी कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती या सर्व बाबींचा विचार करूनच प्रशासक नेमण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना महामारीच्या काळात गावगाडा सुरळीत चालावा यासाठी गावातील योग्य व्यक्तिची प्रशासकपदी नियुक्ती करण्याचा निर्णय शासनाला करावा लागला आहे.

यामध्ये कुठल्याही प्रकारचा राजकीय हेतू नसून लोकशाही मार्गाने पालकमंत्र्यांच्या सल्ल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी योग्य कार्यक्षम व्यक्तीची नियुक्ती करावी हीच अपेक्षा आहे, असे हसन मुश्रीफ यांनी अण्णा हजारे यांना पत्राद्वारे कळविले आहे.

राज्यातील गावे समृध्द करण्यासाठी आपल्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. याविषयी लवकरच आपणाशी चर्चा करणार आहे. तसेच, प्रशासकाच्या निर्णयाबाबतही भेटीच्या वेळी सविस्तर माहिती देईन, असेही मंत्री श्री. मुश्रीफ यांनी पत्रात म्हटले आहे ( Hasan Mushrif will meet to Anna Hajare ) .

ग्रामपंचायतींना मुदतवाढ देता येत नाही

मंत्री मुश्रीफ यांनी पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील १४ हजार २३४ ग्रामपंचायतींचा ५ वर्षाचा कार्यकाळ संपत आला आहे. सन १९९२ साली झालेल्या ७३ व्या घटनादुरूस्तीनुसार ग्रामपंचायतीचा कालावधी ५ वर्षे निश्चित करण्यात आला आहे.

सन २००५ साली कार्यकाळ संपलेल्या १३ जिल्ह्यांतील ग्रामपंचायतींना मुदतवाढ दिली होती. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने या गोष्टीला आक्षेप घेत ते रद्द केले होते. राज्यघटनेत तरतूद नसल्याचा निर्वाळा त्यावेळी निवडणूक आयोगाने दिला होता. त्यावेळी उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयानेही निवडणूक आयोगाचा निर्णय कायम केला होता.

अण्णा हजारेंना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी लिहिले पत्र

उच्च न्यायालयाने तर याच्याही पुढे जाऊन सांगितले होते की, मुदत संपलेल्या सरपंच, उपसरपंच आणि सदस्य यांना अशी मुदतवाढ देऊन त्यांना मागच्या दाराने आणता येणार नाही.

कोरोनाच्या महामारीत व या उद्भवलेल्या परिस्थितीत निवडणूक आयोगाला निवडणूक घेणे शक्य नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाने सरकारला कळविले की, डिसेंबर, २०२० पर्यंत आम्ही निवडणूका घेवू शकत नाही. राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून विस्तार अधिकारी नेमायचे झाल्यास विस्तार अधिकाऱ्यांची संख्या ही मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींपेक्षा अत्यल्प आहे. तसेच विस्तार अधिकारी हे कोरोना महामारीच्या उच्चाटनाच्या कामकाजात व्यस्त आहेत.

पाच वर्षाच्या कालावधीत सरपंचावर अविश्वास ठराव येवून सर्वांनी राजीनामे दिले तर किंवा न्यायालयाने एखादी निवडणूक बेकायदेशीर ठरविली तर प्रशासक नियुक्तीची ग्रामपंचायत अधिनियमात तरतूद आहे. तसेच भ्रष्ट कारभार करून लोकशाहीविरोधी कामकाज केले असे सरकारला वाटले तर तेथे प्रशासक नेमण्याची अधिनियमात तरतूद आहे. परंतु ५ वर्षे कार्यकाळ संपल्यानंतर निवडणूका होवू न शकल्यास काय करावे यासंबंधी अधिनियमात तरतूद अस्तित्वात नाही.

त्यामुळे अधिनियमात शासनाने दुरूस्ती करून युध्द, आणीबाणी, वित्तीय आणीबाणी, महामारी अशा परिस्थितीत निवडणूक घेता येणे शक्य नसल्यास योग्य व्यक्तीची नियुक्ती प्रशासक म्हणून शासनास करता येईल असा प्रस्ताव ग्रामविकास विभागाकडून वित्त विभागाकडे व त्यानंतर विधी व न्याय विभागाने तपासल्यानंतर मुख्य सचिव, उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्री यांच्यामार्फत मंत्रिमंडळासमोर मान्यतेसाठी सादर केला होता. मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर व राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर अध्यादेश निर्गमित करून कायद्यात दुरूस्ती झाली आहे, असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

पालकमंत्री हे जिल्ह्याचे शासनाचे प्रतिनिधी

राज्यातील एकूण १४ हजार २३४ ग्रामपंचायतींवर मुदत संपल्यानंतर प्रशासक नेमणूकीचे अधिकार शासनाने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देऊन पालकमंत्र्यांच्या सल्याने नेमणूक करावी अशा प्रकारे शासन निर्णय निर्गमित केला आहे.

पालकमंत्री हे त्या जिल्ह्याचे शासनाचे प्रतिनिधी म्हणून कामकाज पाहत असतात व जिल्हास्तरीय विविध समित्यांवर सदस्य पालकमंत्र्यांव्दारेच नियुक्त केले जातात. पालकमंत्री त्या जिल्ह्यातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी शासनाचा भाग म्हणून कार्यरत असतात.

जिल्ह्याच्या नियोजन मंडळाचेही ते अध्यक्ष असतात व जिल्ह्यात उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये जिल्हा प्रशासन व शासन यामध्ये दुवा म्हणून काम करतात. पालकमंत्र्यांना मी पत्र लिहून ग्रामपंचायतीमधील सध्याच्या सरपंचाच्या आरक्षणनिहाय गावातील कार्यक्षम व चांगल्या व्यक्तीची नियुक्ती करावी, असे कळविले आहे, असेही मंत्री मुश्रीफ यांनी पत्रात म्हटले आहे.

या सर्व बाबींचा विचार करून कोरोना महामारीच्या काळात गावगाडा सुरळीत चालावा यासाठी छातीवर दगड ठेवून हा निर्णय शासनाला करावा लागला आहे. एखाद्या ग्रामपंचायतीमध्ये नियुक्तीवरून काही वाद झाल्यास किंवा चूकीच्या पध्दतीने नियुक्ती झाल्यास ती रद्द करण्याचा अधिकार ग्रामविकास विभागाला आहे. तसेच या निर्णयाच्या विरोधात उच्च न्यायालय मुंबई, नागपूर व औरंगाबाद खंडपीठ येथे याचिका दाखल झाल्या आहेत. याबाबत उच्च न्यायालयाचा निर्णय स्वागतार्ह आहे, असेही मंत्री मुश्रीफ यांनी पत्रात नमूद केले आहे.

अहमदनगर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी निवड झाल्यानंतर काम करत असतानाही आपले मार्गदर्शन आवश्यक आहे. त्यामुळे मी आपण द्याल त्यावेळी येवून चर्चा करणार आहे, असेही मंत्री मुश्रीफ ( Hasan Mushrif ) यांनी पत्रात नमूद केले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी