32 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
Homeराजकीयउद्धव ठाकरे घुसले एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात, ठाणेकरांकडून जबरदस्त प्रतिसाद

उद्धव ठाकरे घुसले एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात, ठाणेकरांकडून जबरदस्त प्रतिसाद

टीम लय भारी

ठाणे :आताचे मुख्यमंत्री काही झालं लगेच दिल्लीला पळतात, मी सुद्धा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असताना कोणतंच दडपण माझ्यावर नव्हत, फोनची रिंग वाजली की जेवण अर्धवट टाकून पळत जा म्हटल्यावर पळत जाणारा मुख्यमंत्री मी नव्हतो,” असे म्हणून शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर तुफान शाब्दिक फटकेबाजी केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या राजकीय बंडानंतर पहिल्यांदा उद्धव ठाकरे यांनी ठाणे शहराला भेट दिली, त्यावेळी प्रचंड घोषणाबाजीसह ठाणेकरांकडून त्यांना जबरदस्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.

उद्धव ठाकरे यांचे आज शिवसैनिकांकडून ठाण्यात जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांनी जल्लोष करीत  बालेकिल्याचे शिलेदार म्हणवून घेणाऱ्यांना “शिवसेना फक्त उद्धव ठाकरेंची बाकी कोणाचीच नाही” असे यावेळी ठणकावून सांगितले. यावेळी उद्धव ठाकरे काय संबोधित करणार हे ऐकण्यासाठी ठाणेकरांनी चांगलीच गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी सद्यस्थितीवर भाष्य करीत राज्यात चाललेल्या घडामोडींकडे पुन्हा लक्ष वेधून जमलेल्या शिवसैनिकांसमोर दमदार भाषण केले.

ठाण्यात येताच पहिला निशाणा त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर साधत त्यांच्यावर सडकून टीका केली आहे, यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, ज्यांना आपण मोठं केलं ती मोठी झालेली माणसं आता शेफारली आणि तिकडे गेली. हे सगळं घडलं केवळ लोभामुळे, दमदाटीमुळे. आताचे मुख्यमंत्री कित्येक वेळेला दिल्लीला पळतात, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असताना असं कोणतंच दडपण माझ्यावर नव्हत. जेवण अर्धवट टाकून पळत जा म्हटल्यावर पळत जाणारा मुख्यमंत्री मी नव्हतो असे म्हणून ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या दिल्लीवारीवर अचूक बोच ठेवत त्यांच्या कार्यकर्तृत्वावर टीका केली आहे.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांच्या आक्षेपार्ह वक्तव्याचा सुद्धा मुद्दा उपस्थित केला. ठाकरे म्हणाले, राज्यपाल हे महत्त्वाचे, सर्वोच्च असे हे पद आहे. त्या पदावर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना बसण्याचा कोणताच अधिकार नाही. काय आहे हे कारस्थान..काल जे कोश्यारी बोलले त्याचा पुढचा टप्पा म्हणजे मराठी माणसाला संपवायचे, शिवसेना संपवायची. मराठी अमराठी अशी फूट पाडून मराठी माणसाला चिरडून टाकण्यासाठी शिवसेना संपवण्याचे प्रयत्न सुरू आहेत असा आरोपच ठाकरे यांनी यावेळी केला.

ठाकरे पुढे म्हणाले, संजय राऊतांना ईडी प्रकरणी आज अटक सुद्धा होऊ शकते, लाज लज्जा सोडून ही कारवाई सुरू आहे असे म्हणून त्यांनी ईडीच्या आडून वार करणाऱ्यांना चांगलेच फटकारले आहे. या संपुर्ण पार्श्वभूमीवर हे सगळं कारस्थान होत असताना अशा परिस्थितीत दोन हात करायची माझ्या शिवसैनिकांची तयारी आहे का असा सवाल त्यांनी उपस्थित शिवसैनिकांना विचारला. त्यावर या दडपणाला घाबरणारा शिवसैनिक नाही, गोळ्या खायची सुद्धा आमची तयारी आहे साहेब असा सूर सैनिकांमधून त्यावेळी उमटला.

दरम्यान हिंदुत्वाचा पुळका आलेल्यांच्या घरात घुसून त्यांना ठणकावून सांगणारे उद्धव ठाकरे यांची पुढची भूमिका नेमकी कोणती असेल, शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा ठाणे जिल्हा शिंदे गटाकडून परत घेणार का हे सारेच पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

हे सुद्धा वाचा…

ईडीच्या कारवाया मराठी माणसांवर का ?

शिवसैनिकांनी केला काळया टोपीवाल्या राज्यपालांचा निषेध

उद्धव ठाकरे अर्जून खोतकरांना म्हणाले, तुमची अडचण असेल तर तुम्ही जा

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी